

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीतून अमेठीच्या माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं नाव गायब झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रकाशित केलेल्या अंतिम मतदार यादीत त्यांचं नाव नसल्यानं खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांचं नाव अजूनही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांनी २०२१ मध्ये गौरीगंज तालुक्यातील मेदन मवई गावात जमीन खरेदी केली होती. २९ जुलै २०२१ रोजी त्यांचा मुलगा जोहर इराणी यानं निवासस्थानाच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २२ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी गृहप्रवेशही केला होता. तेथील रहिवासी असल्याने त्यांचं नाव गावातील लीला टिकरा बूथवरील मतदार यादीत नोंदवण्यात आलं होतं. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी याच बूथवर मतदान केलं होतं. याआधी ते मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतदार होते.
स्मृती इराणी यांनी एसआयआरद्वारे त्यांचे नाव अमेठीच्या मतदार यादीत नोंदवले होते. पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीतून त्यांचे नाव गायब झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजय चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. अर्ज जमा केला होता की नाही याची पडताळणी केली जात आहे. जर अर्ज मिळाला तर त्यांचे नाव यादीत नोंदवले जाईल, असे चौहान म्हणाले.
याबाबत प्रशासन चौकशी करत आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण स्थिती स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. मात्र, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे नाव मतदार यादीत नसल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.
उत्तर प्रदेशात १० जून रोजी निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. २०२६ च्या अंतिम मतदार यादीनुसार, उत्तर प्रदेशात एकूण १२ कोटी ५८ लाख ५१ हजार ५७० मतदार आहेत. २०२१ मध्ये ही संख्या १२ कोटी २९ लाख ५० हजार ०५२ होती. त्यामुळे २०२१ च्या तुलनेत एसआयआरनंतर मतदारांची संख्या वाढली आहे. त्यातही मृत, स्थलांतर झालेले किंवा अपात्र मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.