
उकळत्या दुधामध्ये पडून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली. राजस्थानच्या डीग येथे मांजरीला घाबरून चिमुकली पळाली आणि उकळत्या दुधाच्या पातेल्यामध्ये पडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, डीग येथील कामा कस्बेच्या अगमा भागामध्ये ही घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या जितेंद्र सिंह यांची ३ वर्षांची मुलगी सारिका टेरेसवर खेळत होती. जवळच चुलीवर दूध गरम करण्यासाठी ठेवले होते. घरातील सर्वजण आपआपल्या कामामध्ये व्यस्त होते. त्यावेळी अचानक टेरेसवर मांजर आली. मांजरीला पाहून सारिका घाबरली आणि ती पळू लागली अन् तिचा तोल जाऊन ती उकळत्या दुधाच्या पातेल्यात पडली.
सारिकाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. उकळत्या दुधामुळे सारिका ५० टक्के भाजली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सारिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सारिकावर जयपूरमध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान तिने प्राण सोडले. सारिकाच्या अचानक सोडून जाण्याने तिच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला.
सारिकाच्या वडिलांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, घरामध्ये स्वयंपाक करत असताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. छोटीशी चूक आपल्या मुलांच्या जीवावर बेतू शकते जे आमच्यासोबत घडलं आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.