

बिहारमधील रोहतास जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय. कौटुंबिक वादातून एका तरुणाने इतकं टोकाचं पाऊल उचललं की गावकरीही स्तब्ध झाले. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर या तरुणाने थेट गावातील शिवमंदिर गाठलं आणि स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून घेतला आहे. सध्या त्याच्यावर वाराणसीमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीये.
ही घटना करगहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसडिहरा गावात घडली. जखमी तरुणाची ओळख विकास कुमार अशी झाली असून तो २५ वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी घरगुती कारणावरून त्याचा पत्नीशी वाद झाला होता. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद हळूहळू वाढत गेला. यामुळे मानसिक तणावात गेला होता, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
वादानंतर काही वेळाने विकास घरातून बाहेर पडला. मात्र तो कुठे गेला याची कोणालाच कल्पना नव्हती. काही वेळानंतर तो थेट गावातील शिवमंदिरात पोहोचल्याचं समोर आलं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या हातात धारदार शस्त्र होतं.
मंदिरात गेल्यानंतर त्याने स्वतःचं गुप्तांग कापून ते भगवान शिवांना अर्पण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना इतक्या अचानक घडली की मंदिर परिसरात उपस्थित लोकांना सुरुवातीला काहीच समजलं नाही. त्यानंतर त्याने त्याच शस्त्राने स्वतःच्या गळ्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला.
मंदिर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विकास दिसताच लोकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि तातडीने त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
कुटुंबीयांनी तत्काळ विकासला सासारामच्या सदर रुग्णालयात दाखल केलं. त्याठिकाणी ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याचं गुप्तांग पूर्णपणे वेगळं झालं होतं आणि गळ्यावरही गंभीर जखमा होत्या. प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी वाराणसीमध्ये हलवलं. सध्या त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. मणिराज रंजन यांनी ही अत्यंत असामान्य घटना असल्याचं म्हटलंय. त्यांच्या मते, मानसिक तणाव किंवा इतर कारणांमुळे तरुणाने इतकं टोकाचं पाऊल उचललं असावं. या घटनेमुळे त्याला कायमस्वरूपी शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीये.
या घटनेनंतर संपूर्ण गावात आणि आसपासच्या भागात एकच चर्चा सुरू आहे. साध्या कौटुंबिक वादामुळे एखादी व्यक्ती इतक्या टोकाला जाऊ शकते का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.