
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी मोठा अपघात झाला. उड्डाण घेताच काही सेकंदामध्ये हे विमान कोसळले. या विमान अपघातामध्ये आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान होते. या विमानातून १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी प्रवास करत होते. विमान अपघातमध्ये २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.
तर ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान पडले त्याठिकाणच्या ३४ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये सुदैवाने विमानामधील एक प्रवासी बचावला. अपघात झाल्यानंतर या प्रवाशाने खाली उडी मारत आपला जीव वाचवला. रमेश विश्वासकुमार असं या प्रवाशाचे नाव आहे. उड्डाणानंतर काही सेकंदांनी झालेल्या या भयानक अपघातातून बचावलेल्या एक प्रवासी हा चमत्कारापेक्षा कमी नाही.
रमेश विश्वासकुमार बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होते आणि त्यांचा सीट नंबर 11A होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा सीट नंबर 11A पहिल्यांदाच भाग्यवान ठरला नाही. तर २७ वर्षांपूर्वी थाई स्टार रुआंगसाक जेम्स लॉयचुसाक देखील अशाच प्रकारच्या मोठ्या विमान अपघातातून वाचला होता. त्याचा देखील सीटनंबर हाच होता. त्यामुळे सध्या या सीट नंबरवर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
१९९८ साली थाई एअरवेजच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातातून ४७ वर्षांचा थाई अभिनेता-गायक रुआंगसाक जेम्स लॉयचुसाक थोडक्यात बचावला होता. या विमान अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन विमान अपघाताची बातमी ऐकल्यानंतर जेम्स लॉयचुसाक या अभिनेत्याने हा खुलासा केला. लॉयचुसाक म्हणाला की, माझ्याप्रमाणेच एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन विमानातही चमत्कार घडला. सीट 11A वर बसलेला प्रवासी रमेश विश्वासकुमार बचावला.
१९९८ साली झालेल्या विमान अपघातावेळी तो २० वर्षांचा होता असे रुआंगसाक जेम्स लॉयचुनाकने सांगितले. या विमान अपघातादरम्यान तो सीट नंबर 11A वर बसला होता. अहमदाबादमध्ये नुकताच झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीचा देखील सीट नंबर 11A होता. रुआंगसाक फ्लाईट TG261 मधून प्रवास करत होता. लँडिंग करताना ते विमान दलदलीत कोसळले. या विमान अपघातात फक्त ४५ जण बचावले होते त्यामध्ये रुआंगसाकचा समावेश होता. एअर इंडियाच्या अपघातात बचावलेल्या रमेश विश्वासकुमार यांचा सीट नंबर 11A पाहून रुआंगसाक जेम्स लोयचुनाकच्या अंगावर काटा आला. त्याला त्याचा सीट नंबर आठवला.
लॉयचुसाकने सोशल मीडियावर पोस्ट करत याचा उल्लेख केला. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, 'भारतात एअर इंडियाच्या विमान अपघातातून बचावलेला एकमेव व्यक्ती माझ्या 11A या सीट नंबरवर बसला होता. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला.' रुआंगसॅकने पुढे सांगितले की, 'जरी मी विमान अपघातातून थोडक्यात बचावलो असलो तरी मला खूप मोठा धक्का बसला होता. १० वर्षांपर्यंत मला विमान प्रवास करायला भीती वाटत होती. तेव्हा मी लोकांपासून दूर पळून जायचो आणि ढग पाहून मला घाबरायला व्हायचे. मी कोणाशीही बोलणे टाळायचो आणि नेहमी खिडकीबाहेर पाहत राहायचो, कोणालाही खिडकी बंद करण्यापासून रोखायचो जेणेकरून मला सुरक्षित वाटेल. जर मला बाहेर काळे ढग किंवा वादळ आल्यासारखे दिसले तर मला खूप वाईट वाटायचे, जणू मी नरकात आहे असे मला वाटायचे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.