अजमेर-कोटा महामार्गावर सराना परिसरात मध्यरात्री भीषण अपघात
भरधाव ट्रेलरने भाजप आमदारच्या कारला मागून जोरदार धडक
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
एअरबॅगमुळे वाचला जीव
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात अजमेर-कोटा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. केकडी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शत्रुघ्न गौतम यांच्या कारला भरधाव ट्रेलरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात आमदार गौतम आणि त्यांचा ड्राइव्हर विनोद गुर्जर हे दोघेही सुदैवाने वाचले. अपघाताची तीव्रता पाहता मोठी दुर्घटना टळल्याने समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न गौतम हे किशनगढ येथे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. बैठक झाल्यानंतर ते रात्री उशिरा कारमधून केकडीकडे परतत होते. त्यांची गाडी अजमेर-कोटा महामार्गावरील सराना परिसरात पोहोचली असताना मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की कारचं नियंत्रण सुटलं आणि पुढे जात असलेल्या आणखी एका वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात आमदारांच्या वाहनाच्या पुढील आणि मागील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग उघडल्याने शत्रुघ्न गौतम आणि चालक विनोद गुर्जर यांना गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीही झाली. घटनेची माहिती मिळताच सराना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रेलरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शत्रुघ्न गौतम हे केकडीचे विद्यमान भाजप आमदार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गावपातळीवरून केली. ते प्रथम आपल्या देवगाव या पैतृक गावचे सरपंच झाले. २०१३ मध्ये भाजपने त्यांना केकडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. रघु शर्मा यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांना तत्कालीन वसुंधरा राजे सरकारमध्ये संसदीय सचिवपदाची जबाबदारी मिळाली. २०१८ मध्ये पराभव झाल्यानंतरही गौतम यांनी राजकीय सक्रियता कायम ठेवली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी रघु शर्मा यांचा पराभव करत केकडी मतदारसंघातून पुनरागमन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.