Presidential Election 2022 Results: आज देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणी (Voting) सुरू होणार आहे. त्यामुळे देशाचा 15 राष्ट्रपती (President) कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (UPA) यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होणार असल्याने आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी होण्याची अपेक्षा आहे. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनतील.
15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. खरे तर 15 वर्षांपूर्वी 21 जुलै रोजी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत प्रतिभा पाटील विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 25 जुलै 2007 रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
हे देखील पाहा -
प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या
प्रतिभा देवीसिंह पाटील देशाच्या 12व्या राष्ट्रपती झाल्या आणि 2012 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. देशातील हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर आता एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी होतील आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनतील तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार असून नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील. सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या आहेत. संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. या सभागृहात चोवीस तास मतपत्रिकांची सुरक्षा करण्यात येत आहे.
द्रौपदी मुर्मूचा विजय जवळपास निश्चित
निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पी.सी. मोदी गुरुवारी मतमोजणीवर लक्ष ठेवणार असून, सायंकाळपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पी.सी. मोदी आधी सर्व खासदारांच्या मतांची मोजणी करणार आहे त्यानंतर निवडणुकीच्या ट्रेंडची माहिती देतील आणि त्यानंतर 10 राज्यांची मते मोजल्यानंतर पुन्हा माहिती शेअर करतील.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संसद भवनासह ३१ ठिकाणी आणि विधानसभांमधील ३० केंद्रांवर मतदान झाले. अनेक राज्यांत मुर्मूच्या बाजूने 'क्रॉस व्होटिंग' झाल्याच्या बातम्याही आल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना व्हिप जारी केला जात नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.