बाजौर येथे पाकिस्तानी लष्करी कॅम्पवर आत्मघाती हल्ला
१५ सैनिक ठार, अनेक जखमी
टीटीपीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
स्फोटानंतर दहशतवाद्यांची घुसखोरी आणि चकमक
सुरक्षा यंत्रणा सतर्क, परिसरात तणाव
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर येथे पाकिस्तानी लष्कराच्या कॅम्पवर मोठा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १५ सैनिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, अनेक जण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला अतिशय नियोजनपूर्वक करण्यात आला होता. सुरुवातीला आत्मघाती दहशतवाद्याने लष्कराच्या कॅम्पजवळ जोरदार स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे कॅम्पमध्ये मोठी अफरातफर उडाली. त्याचाच फायदा घेत काही सशस्त्र दहशतवादी कॅम्पमध्ये घुसले. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये काही वेळ चकमक सुरू होती. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, हा हल्ला त्यांच्या ‘स्पेशल इस्तशहादी फोर्स’ने केला. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित आणि मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२५ मध्ये क्वेटा येथे झालेल्या हल्ल्यानंतर टीटीपीने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अधिकृतपणे घेतली आहे. त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजौर हा भाग बराच काळ दहशतवादाच्या छायेत राहिला आहे. येथे यापूर्वीही अशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत.
या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.