PM Modi Speech : पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, खुर्ची जाणारच; PM मोदींनी ठणकावलं
पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारमध्ये १३ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन
दोन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून बिहारला दिली मोठी भेट
भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगातून सरकार चालवता येणार नाही, खुर्ची जाणार
प्रत्येक गरीबाला घर मिळेपर्यंत PM आवास योजना सुरू राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमध्ये आज, शुक्रवारी १३ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दिला. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधित केले. मला जनतेचा सेवक म्हणून काम करण्यात आनंद मिळतो, असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रीय जनता दलावर जोरदार हल्लाबोल केला. आरजेडीच्या लालटेन राजवटीत बिहारला दहशतीनं घेरलं होतं, असा आरोप त्यांनी केला. नव्या कायद्याबाबत मोदींनी प्रतिक्रिया दिली. या कायद्याच्या अखत्यारित आता पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री येणार आहेत. ३० दिवसांच्या आत जर जामीन मिळाला नाही तर, ३१ व्या दिवशीही त्यांची खुर्ची जाईल, असंही ते म्हणाले.
जेलमधून सरकार चालणार नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच लोकसभेत १३० वी घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. या विधेयकानुसार ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस तुरुंगात असेल तर, ३१ व्या दिवशी पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. या नव्या घटना दुरुस्तीबाबत पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा या नव्याने होणाऱ्या कायद्याच्या अखत्यारित येणार आहेत. जर ३० दिवसांच्या आत एखाद्या गुन्ह्यात जामीन मिळाला नाही तर ३१ व्या दिवशी संबंधिताला आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागेल. तुरुंगात राहून सरकार चालवण्याचा कोणताही अधिकार नसेल. जो तुरुंगात जाईल त्याला खुर्ची सोडावी लागेल. भ्रष्टाचारी आता तुरुंगात जाईल आणि त्याची खुर्ची पण जाईल, असेही मोदी म्हणाले.
मला जनतेचा सेवक बनून काम करण्यात सर्वात जास्त आनंद मिळतो. जोपर्यंत सर्वांना हक्काचं घर मिळत नाही, तोपर्यंत हा मोदी शांत बसणार नाही असा माझा संकल्प आहे. याच विचारातून गेल्या ११ वर्षांत ४ कोटींहून अधिक गरिबांना पक्की घरे दिली आहेत. एकट्या बिहारमध्ये ३८ लाखांहून अधिक घरांची निर्मिती केली आहे. गयाजीमध्ये २ लाख लोकांना घरे मिळाली आहेत. आम्ही केवळ चार भिंती दिल्या नाहीत तर गरिबांना त्यांचा स्वाभिमान मिळवून दिला आहे. जोपर्यंत प्रत्येक गरिबाला घर मिळत नाही तोपर्यंत पंतप्रधान आवास योजना सुरूच राहील, असा संकल्पही त्यांनी यावेळी सोडला.
यंदाची दिवाळी स्पेशल
यावेळी बिहारमध्ये दिवाळी आणि छटपूजेला आधीपेक्षा जास्त रोषणाई असणार आहे. जे अद्यापही पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की, जोपर्यंत प्रत्येक गरिबाला आपलं हक्काचं पक्कं घर मिळत नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहील, असं आश्वासन मोदी यांनी दिलं. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. आता भारतात दहशतवादी पाठवून हल्ले केल्यानंतर कोणीच वाचणार नाही. दहशतवादी अगदी पाताळात तरी लपले असतील तर भारताची क्षेपणास्त्रे त्यांना जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.