
मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजेच अर्थात लोकल. याच लोकलविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या २३८ लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते राज्यसभेत रेल्वेच्या कामकाजावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. तसेच मुंबईत जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येणार असल्याचंही अश्विनी वैष्णव म्हणालेत.
किमान भाड्यात सुरक्षित प्रवास
रेल्वे प्रवाशांना मिळणाऱ्या अनुदानावर बोलताना रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, 'प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर ₹१.३८ आहे, पण प्रवाशांकडून फक्त ७३ पैसे घेतले जातात. म्हणजेच ४७% अनुदान दिले जाते. वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवाशांना ₹५७ हजार कोटींचे अनुदान देण्यात आले होते. जे २०२३-२४ मध्ये वाढून सुमारे ₹६० हजार कोटी झाले आहे. आमचे ध्येय किमान भाड्यात सुरक्षित आणि उत्तम सेवा पुरवणे आहे'.
रेल्वे सुरक्षेवर विशेष भर देत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत ४१,००० LHB कोच तयार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व ICF कोच LHB मध्ये रूपांतरित होतील. लांब रुळ, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाइसेस आणि 'कवच' प्रणाली जलदगतीने लागू केली जात आहे. रेल्वेचा पायाभूत विकास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वेच्या भांडवली खर्चाला प्रचंड वाढ दिली आहे. पूर्वी रेल्वेला ₹२५ हजार कोटींचा निधी मिळायचा. जो आता ₹२.५ लाख कोटींहून अधिक झाला आहे', अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटना
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेवर भाष्य करताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 'उच्चस्तरीय समिती या दुर्घटनेची चौकशी करत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व डेटा जतन करण्यात आले असून, ३००हून अधिक लोकांकडून माहिती घेण्यात येत आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून १० महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत', असंही रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.
भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की भारतीय रेल्वे गरीब प्रवाशांसाठी वचनबद्ध आहे, म्हणूनच सामान्य डब्यांची संख्या एसी कोचच्या तुलनेत २.५ पट वाढवली जात आहे. सध्याच्या उत्पादन योजनेनुसार, १७ हजार नॉन-एसी कोच तयार केले जाणार आहेत. भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत असून, रेल्वे स्वतःच्या उत्पन्नातून सर्व मोठे खर्च व्यवस्थापित करत आहे', असंही रेल्वेमंत्री म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.