

खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान
महिलांच्या शोषणाबाबत राजकारण्यांवर केले गंभीर आरोप
हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं असल्याचा दावा
विधानानंतर बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलं
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे. 'महिलांना राजकारणात येण्यासाठी अनेक प्रकारच्या दबावांना सामोरे जावे लागते. काही राजकीय पक्षांचे नेते महिलांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांचे शोषण करतात', असा आरोप त्यांनी केला आहे. 'पाटण्यातील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं. एका वृत्तपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमध्येही अशाच प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत.', असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खासदार पप्पू यादव म्हणाले की, 'ही समस्या केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. तर ती शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र आणि पोलिस यंत्रणेपर्यंत पसरलेली आहे. शिक्षकांची विद्यार्थिनींवर वाईट नजर असते, कॉर्पोरेट कंपन्यांची तरुणींवर वाईट नजर असते आणि पोलिसांची सुद्धा महिलांवर वाईट नजर असते.' पप्पू यादव यांनी राजकारण्यांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर त्यांना महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर ते म्हणाले की, त्यांनी अशा नोटिसा कचराकुंडीत फेकून दिल्या आहेत. कितीही नोटीस पाठवल्या तरी मी या विषयावर बोलणं थांबवणार नाही.' असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पप्पू यादव यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पप्पू यादव यांनी या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण देताना काही अश्लील गाण्यांचा संदर्भ दिला. ते म्हणाले, 'अशा गाण्यांना कोण प्रोत्साहन देत आहे आणि समाज कोणत्या दिशेने जात आहे?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसवरही तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'जी लोकं स्वतः अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये सहभागी आहेत ते मला नोटीस पाठवत आहेत.'
महिला आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पप्पू यादव यांनी वादग्रस्त विधान केले होते तेव्हापासून ते चांगलेच चर्चेत आले आहेत. ते म्हणाले होते की, प्रभावशाली नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय मोठ्या संख्येने महिला राजकारणात पुढे जाऊ शकत नाहीत. महिलांवरील गुन्ह्यांसाठी राजकीय नेतृत्वाची मानसिकता जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. नेत्यांच्या बेडरूमपर्यंत गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारणात येऊ शकत नाहीत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर बिहारच्या महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.