

अनैतिक संबंधांच्या जाळ्यात अडकलेल्या नात्यांचा अत्यंत थरारक आणि भयानक शेवट झाला आहे. वहिनीला मिळवण्यासाठी दीराने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत सख्या भावाचाच काटा काढल्याची घटना उत्तर प्रदेशमधील आग्र्यामध्ये घडली. धक्कादायक म्हणजे, सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर जराही पश्चात्ताप नव्हता, उलट त्याचे क्रूर हसू पाहून तपासासाठी आलेले पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अमित उर्फ सोलू बुधवारी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. त्यानंतर थोड्याच वेळात गावाजवळील झुडपांमध्ये त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. अमितच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर एका जड वस्तूने वार करण्यात आले होते. रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून याबाबत पोलिसांना मिळाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अन् पंचनामा केला. अमितचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
सुरुवातीला हा एक अज्ञात खुनाचा प्रकार वाटत होता, पण तपासातून समोर आलेल्या माहितीनंतर पोलिसांनाही धक्का बसला. लग्नानंतर लगेचच अमितची पत्नी खुशी आणि त्याचा धाकटा भाऊ भोलू यांच्यात मैत्री झाली होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एके दिवशी अमितने त्यांना नको त्या स्थितीत पाहिले. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला. खुशीने भोलूला सांगितले की जोपर्यंत अमित निघून जात नाही, तोपर्यंत ते एकत्र राहू शकत नाहीत. त्यानंतर दोघांनी हत्येचा कट रचला. भोलूने अमित याच्यावर मागून हल्ला केला. हत्या केल्यानंतर मृतदेह झुडपात लपवला.
सीसीटीव्हीने गुपित उघडकीस आणले
घटनेनंतर भोलूने ढाब्यावर काम करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणावर खुनाचा आरोप केला अन् पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात अमित घरातून बाहेर पडताच भोलू त्याचा पाठलाग करताना दिसला. गुन्हा केल्यानंतर तो अत्यंत अस्वस्थ अवस्थेत परत येत असल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाकीचा हिसका दाखवला. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.