

महायुतीत पुन्हा तणाव निर्माण झाल्याची चर्चा.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत नाराजी
उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीत धडधड वाढली आहे.
शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्यानं महायुती सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत असतानाही शिवसेनेला काही ठिकाणी तडजोड करावी लागली, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट इशारा शिवसेनेला इशारा दिला आहे. यासर्व घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
एकनाथ शिंदे ऐनवेळी दिल्ली दौऱ्यावर गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. एकनाथ शिंदे सोमवारी दुपारनंतर अचानक दिल्लीला रवाना झालेत. राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालं. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी निवड करत असताना अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले गेलं. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. याचदरम्यान आज एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांने दिली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीबाबतची माहिती वरिष्ठाना देणार आहेत. त्यामुळे आता दिल्ली दरबारी याबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता आता सर्वाना लागली आहे. यावरून शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय.
महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला यश मिळाले. ठाणे, कल्याणमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर झाला. तर मुंबई, पुणे, नागपूर नाशिकसह अनेक ठिकाणी भाजपचा महापौर झाला. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला. मात्र निकालानंतर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.