मध्यप्रदेशमध्ये एका IAS अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. IAS अधिकारी नेहा मारव्या सिंह यांची एका वर्षात चौथ्यांदा बदली झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी IAS अधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये आपली व्यथा मांडत व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 5 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर झालेल्या बदलीच्या यादीचा उल्लेख करत नेहा मारव्या सिंह यांनी आपण अत्यंत त्रस्त असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या पदावर रुजू होऊन अवघे 50 दिवस झाले असतानाच आपली बदली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच संताप व्यक्त करत त्यांनी प्रश्न विचारला की, एखादा IAS अधिकारी इतका कमजोर कसा असू शकतो की त्याच्यासोबत काम करणारे कर्मचारीच त्याची बदली करून घेण्यात यशस्वी ठरतात?
नेहा मारव्या सिंह यांचा हा मेसेज IAS अधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांनी बराचवेळ शांतता आणि संयम राखला. मात्र, आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, त्यांच्याच सोबतचे कर्मचारी त्यांची बदली करून घेण्याची धमकी देऊ लागले आहेत.
नेहा मारव्या सिंह यांनी आपल्या संदेशाची सुरुवात वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांना संबोधित करून केली. IAS अधिकारी म्हणून राज्य सरकार त्यांना ज्या ठिकाणी नियुक्त करेल, तिथे काम करण्यास सांगू शकते, याची आपल्याला पूर्ण जाणीव असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारी आदेशांचा आपण नेहमीच सन्मानपूर्वक स्वीकार केला आहे. मात्र, यावेळी झालेली बदली अत्यंत निराशाजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बदलीच्या कारणाबाबतही नेहा यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात बंडखोरीसारखी परिस्थिती निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला. या कर्मचाऱ्यांवर त्यांचे थेट प्रशासकीय नियंत्रण नव्हते, तर त्यांच्या आस्थापनेशी संबंधित नियंत्रण विभागाकडे होते, असेही त्यांनी सांगितले.
नेहा यांच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या टेबलवर येऊन तुमची बदली करून देऊ अशी धमकी दिली. कर्मचाऱ्यांकडून होत असलेली शिस्तभंगाची कृत्ये, फाइल्स थांबून ठेवणे आणि विभागात आपल्यासोबत करण्यात आलेल्या गैरवर्तनाची माहिती त्यांनी योग्य माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली होती. असा खळबळजनक आरोप त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.