भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने रविवारी रात्री प्रशासनात फेरबदल करत 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्त संस्कृती जैन यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जबलपूर महानगरपालिकेचे आयुक्त रामप्रकाश अहिरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन विभागाने यासंदर्भातील प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहेत.
संस्कृती जैन यांची मध्य प्रदेश सरकारच्या वित्त विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या याआधी भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्तपदासह मध्य प्रदेश मेट्रो रेल कंपनी लिमिटेडच्या अपर प्रबंध संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या. दरम्यान, 2018 बॅचचे आयएएस अधिकारी रामप्रकाश अहिरवार हे याआधी जबलपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेश मेट्रो रेल कंपनी लिमिटेड, भोपाळच्या अपर प्रबंध संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांना देण्यात आला आहे.
या प्रशासकीय फेरबदलात अंजू अरुण कुमार आणि अग्रिम कुमार यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अंजू अरुण कुमार यांची पंचायत आणि ग्रामीण विकास विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या याआधी भोपाळ स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होत्या.
तर, छिंदवाडा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले 2020 बॅचचे आयएएस अधिकारी अग्रिम कुमार यांची जबलपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे भोपाळ आणि जबलपूर महानगरपालिकांच्या आयुक्तपदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, इतर दोन अधिकाऱ्यांनाही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.