जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलांची मोठी दहशतवादविरोधी कारवाई
जंगलगाम गावात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित लतीफ भट ठार
2025 पासून लतीफ भट बेपत्ता असल्याची माहिती.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी लतीफ भट याला ठार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा यंत्रणा त्याच्या शोधात होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी कुलगाममधील जंगलगाम गावात लतीफ भट लपून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. अखेर या कारवाईत लतीफ भट मारला गेला.
लतीफ भट हा अवघ्या 23 वर्षांचा होता. तो कुलगाममधील ख्रेबान गावचा रहिवासी होता. वर्ष 2025 पासून तो बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याबाबत तक्रार दाखल केली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, तो भारतातील लष्कर-ए-तोयबाचा शेवटचा कमांडर होता. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. या चकमकीदरम्यान सुरक्षादलांनी लतीफला शरण येण्याची संधी दिली होती. जवानांनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला आहे.
मात्र, त्याने शरण यायला नकार दिला. त्यानंतर जवानांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पुढील तपास सुरु केला. 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या CRPF कॅम्पवरील हल्ल्यात लतीफचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला होता. मंगळवारीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निसटण्यात यशस्वी झाला. बुधवारी अखेर जवानांनी त्याला घेरून ठार केले. CRPF चे महासंचालक जी. पी. सिंह यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना जवानांचे अभिनंदन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.