

उत्तर प्रदेशात जालौन - झांसी - कानपूर नॅशनल हायवे २७ वर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोल्हुपूरजवळ चौरासा गुबंदजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली आलिशान कार पाठीमागून ट्रकच्या खाली घुसली. ही धडक इतकी जोरात होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.
प्राथमिक माहितीनुसार, कारचालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला. कारमधील भाविक अयोध्या दर्शनाहून ललितपूर येथे परतत होते. त्यांची कार जोल्हुपूर येथे पोहोचली. त्यावेळी अचानक चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. ही भरधाव कार पुढे असलेल्या ट्रकखाली घुसली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सहा भाविक हे ललितपूर येथील महरौनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदौल मोहल्ल्यातील रहिवासी होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जालौनचे जिल्हाधिकारी राजेश कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक विनय कुमार सिंह, कालपी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय ब्रह्म तिवारी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस दलाकडून मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. अपघातात कारचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. कारमध्ये मृतदेह अडकले होते. तर जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
या अपघातानंतर हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत केली. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. चालकाला डुलकी लागल्यानं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अन्य बाजू देखील तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेत मृत्यू झालेले सर्व भाविक ललितपूरचे रहिवासी होते. सर्व जण अयोध्या येथून दर्शनाहून ललितपूरला परतत होते. त्यावेळी कारचालकाला डुलकी लागली. त्यामुळे हा अपघात घडला, अशी माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार सिंह यांनी वृत्तसंस्थांना दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.