

अमेरिका-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरली
२१ तासांच्या चर्चेनंतरही करार झाला नाही
इराणने अमेरिकेच्या अटी नाकारल्या
पुढील निर्णय ट्रम्प यांच्यावर अवलंबून
अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली शांतता चर्चा अयशस्वी ठरली. २ आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये शांतता चर्चा झाली. ही शांतता चर्चा अयशस्वी ठरली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी सांगितले की, 'इराण अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे आमचे प्रतिनिधी मंडळ अमेरिकेत परत जात आहे.'
इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तब्बल २१ तास शांतता चर्चा झाली. पण ही चर्चा निष्फळ ठरली. ही माहिती अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी दिली. त्यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी इराणसोबत २१ तास चर्चा केली. आम्ही चांगल्या हेतूने आलो होतो. पण शांतता चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. इराण अटी स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही अमेरिकेला परत जात आहोत. अनेक मुद्द्यांवर इराणसोबत कोंडी झाली आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवीत असे आम्हाला वाटत नाही.'
तसंच, 'इस्लामाबादमधील शांतता चर्चा २१ तास चालली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अमेरिकन शिष्टमंडळाने इराणला आपला सर्वोत्तम प्रस्ताव दिला. जो त्यांचा अंतिम प्रस्तावही होता. पण इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर कोंडी कायम आहे. यामुळे इराणसोबतची अमेरिकेची शांतता चर्चा अनिर्णित राहिली आहे. आम्ही कोणत्याही कराराशिवाय परतत आहोत. या प्रकरणात पुढे काय होईल हे काळच ठरवेल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे काय करायचे याची दिशा ठरवतील आणि मग हा विषय संपेल.', असे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी शांतता चर्चेसाठी अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. त्यांच्यासोबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ उपस्थित होते. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केले होते. पाकिस्तानकडून या चर्चेमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर हे उपस्थित होते. इराण- अमेरिकेतील या शांतता चर्चेमध्ये नेमका काय निर्णय होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. पण ही चर्चा निष्फळ ठरली आता ट्रम्प काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.