is India going into lockdown due to Iran war fact check : इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार असल्याचा एक मेसेज व्हॉट्सॲपवर वेगाने व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालयाचा लोगो असलेल्या या मेसेजवर अनेकजण विश्वास ठेवत आहेत. तुमच्यापर्यंत हा मेसेज अजून पोहोचला नसेल, तर तुमच्या कुटुंबातील अथवा ऑफिसमधील सहकाऱ्यांपर्यंत तो नक्कीच पोहोचलेला असू शकतो. 'इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला प्रतिसाद म्हणून भारत युद्धकालीन लॉकडाऊन लागू करत आहे', असा उल्लेख असलेला हा मेसेज एखाद्या सरकारी अधिसूचनेसारखा दिसत आहे. याची भाषा अधिकृत सरकारी वाटणारी असून त्यावर मंत्रालयाचा लोगो आहे. काही मेसेजमध्ये तर आदेश क्रमांकाचाही उल्लेख आहे, तसेच तारखा आणि निर्बंधही दिलेले आहेत. पण थांबा...
व्हॉट्सॲपवर फिरणारा हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. भारतात युद्धकालीन लॉकडाऊन लागू करण्यात आलेला नाही आणि भविष्यातही तसा कोणताही विचार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही महत्त्वाचा प्रश्न असा की, अनेकजण यावर विश्वास का ठेवत आहेत? आणि हा मेसेज का फॉरवर्ड केला जात आहे? जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर घाबरू नका; कारण भारतात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. ही केवळ एक अफवा आहे.
आज 'एप्रिल फूल' आहे आणि आजच्या दिवशी अफवा पसरवण्याची जणू परंपराच झाली आहे. खेळाडू किंवा सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या, कंपन्यांच्या बनावट घोषणा किंवा नवीन उत्पादनांविषयीचे दिशाभूल करणारे दावे केले जातात. अनेकदा यात अधिकृत स्रोत नसतानाही लोक त्यावर सहज विश्वास ठेवतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी नेहमी अधिकृत माहितीवरच अवलंबून राहा, कारण अफवांमुळे मोठे नुकसान होऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन टंचाई असल्याचे वृत्त आहे, त्यातच पाच वर्षांपूर्वीचा कोरोना लॉकडाऊनही लोक विसरलेले नाहीत. भारताशेजारील काही देशांत इराण युद्धामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा हा मेसेज वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ही अफवा लोकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत आहे, ज्यामुळे ती एका साध्या एप्रिल फूलच्या मस्करीपेक्षा अधिक धोकादायक ठरते. परंतु, यावर जास्त विचार करू नका; यात कोणतेही तथ्य नाही.
सत्यता पडताळण्यासाठी तुम्हाला कोणाला फोन करण्याची किंवा अधिकृत पुष्टीकरणाची वाट पाहण्याची गरज नाही. केवळ पाच सेकंदात तुम्ही स्वतः तपासू शकता. सरकारचे अधिकृत माध्यम असलेल्या pib.gov.in या संकेतस्थळावर जा. तिथे राष्ट्रीय महत्त्वाचा प्रत्येक सरकारी आदेश प्रसिद्ध केला जातो. भारतीयांवर परिणाम करणारा असा कोणताही निर्णय झाला असता, तर त्याची माहिती तिथे नक्कीच असती; मात्र तिथे अशी कोणतीही बातमी नाही.
तसेच, कोणतीही प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिनी किंवा न्यूज वेबसाईट तपासा. लॉकडाऊनसारखी मोठी घोषणा झाल्यास, ती जाहीर झाल्याच्या काही मिनिटांतच प्रत्येक वाहिनीवर आणि वेबसाईटवर 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून झळकू लागेल. जर टाइम्स ऑफ इंडिया, एनडीटीव्ही आणि साम टीव्ही यांसारख्या विश्वसनीय माध्यमांवर ही बातमी नसेल, तर समजून जा की अशी कोणतीही घोषणा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.