Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Success Story Govind Jaiswal IAS : मोठं होऊन मोठा माणूस व्हायचं, असं एकदा मनाशी ठरवलं आणि ती जिद्द कायम ठेवली, कठोर मेहनत केली तर यश हमखास मिळतंच. गोविंद जयस्वाल यांचं आयुष्यही तसंच आहे. पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाले. त्यांची प्रेरणादायी आणि संघर्षमय कहाणी जाणून घेऊयात.
रिक्षाचालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी, वाचा सक्सेस स्टोरी
रिक्षाचालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी, वाचा सक्सेस स्टोरी /Social mediasaam tv
Published On

मित्राकडं गेला. तिथं रिक्षाचालकाचा मुलगा म्हणून हिणवलं. अपमान जिव्हारी लागला. काळजाला भिडला. तेच अपमानाचे शब्द पुढे प्रेरणा बनले. जिद्द आणि चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आणि थेट आयएएस अधिकारी झाला. ही प्रेरणादायी, संघर्षमय कहाणी आहे गोविंद जयस्वालची.

घरची परिस्थिती हलाखीची होती. समोर अडचणींचा डोंगर उभा होता. पण त्या डोंगराखाली दबला नाही. यशाचा मार्ग चालत राहिला. शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकतो हे मनोमन जाणलं. शिक्षणच पूर्ण केलं नाही तर, सर्वात कठीण समजली जाणारी स्पर्धा परीक्षा यूपीएससी उत्तीर्ण झाला आणि आयएएस अधिकारी झाला. गोविंद जयस्वालची ही यशोगाथा देशातल्या लाखो-कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणा देणारी आहे. सध्याच्या घडीला गोविंद जयस्वाल दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयात ज्वाइंट सेक्रेटरी म्हणून सेवेत आहेत.

गोविंद जयस्वाल हे वाराणसीत कुटुंबासोबत राहत होते. त्यांचे वडील रिक्षा चालवायचे. आई गृहिणी. आई-वडील आणि तीन बहिणी आणि गोविंद असं त्याचं छोटंसं कुटुंब. गरिबीला कवटाळून न बसता पोटाला चिमटा काढून आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्यांना सरकारी शाळेत शिकवलं. गोविंद हे सातवीत असताना आईचं निधन झालं. संपूर्ण कुटुंब कोलमडलं. घरातली परिस्थिती हलाखीची होती. आईच्या आजारपणात खूप खर्चही झाला होता. आता मुलगा थोडा मोठा झाला आहे. तो सुद्धा रिक्षा चालवून काही पैसे कमावेल, असा विचार गोविंद यांच्या वडिलांच्या मनात आला. दोघेही रिक्षा चालवून काही पैसे जमा होतील आणि त्यातून बहिणींचे लग्न होईल, असंही त्यांना एकवेळ वाटलं. पण गोविंद यांना शिक्षण घेऊन मोठं व्हायचं होतं. रिक्षा चालवायची नव्हती.

गोविंद ११ वर्षांचे असताना आपल्या एका मित्राच्या घरी गेले होते. तिथे काही लोकांनी त्यांना टोमणे मारले. वडील रिक्षा चालवतात म्हणून हिणवलं. आता तुलाही वडिलांसारखीच रिक्षा चालवायची आहे असं काही म्हणाले. हेच अपमानास्पद शब्द काळजात खोलवर जखम करून गेले. हीच जखम पुढे जिद्द बनली. आता रिक्षा चालवायची नाही तर काहीतरी करून दाखवायचं असं मनोमन ठरवलं आणि त्या दिशेने प्रवास सुरू झाला.

रिक्षाचालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी, वाचा सक्सेस स्टोरी
Success Story: लोकांनी टोमणे मारले; LLB करताना दिली UPSC; आज पुण्यात ऑफिसर; IPS तेजस्वी सातपुते यांचा प्रवास

गावातीलच एका वडिलधाऱ्या व्यक्तीनं त्याला यूपीएससी परीक्षेच्या बाबतीत सांगितलं. त्यावेळीच आयएएस अधिकारी व्हायचं ठरवलं. वडिलांनी जमीन विकली. पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं. तिथं काही मुलांना गणित शिकवायचे. एक वेळ जेवण करायचे. पैशांची बचत केली. त्यातूनच भाड्याने खोली घेतली. पुस्तके खरेदी केली. कठोर मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. सन २००६ मध्ये गोविंद यांनी ४८ व्या रँक मिळवली. गोविंद हे आज लाखो तरुणांचे प्रेरणास्थान आहेत.

रिक्षाचालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी, वाचा सक्सेस स्टोरी
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com