हिमाचल प्रदेशात पावसामुळे ३७० जणांचा मृत्यू झाला आहे.
१,४८० घरांचे नुकसान, तर शेती आणि फलोत्पादनाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
६१५ रस्ते बंद, १,७४८ वीज ट्रान्सफॉर्मर खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू असून परिस्थिती अद्याप गंभीर आहे.
हिमाचल प्रदेशात यंदाच्या मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. राज्याला मुसळधार पावसाचा फटका बसला असून, अवकाळी पूर, भूस्खलन आणि वीज कोसळण्याच्या घटनांनी शेकडो जीव घेतले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ३७० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी धक्कदायक असल्याचं म्हटलं जात आहे.
या आकडेवारीत पावसाशी थेट संबंधित दुर्घटना, जसे की भूस्खलन, अचानक आलेले पूर, बुडणे आणि वीज कोसळणे यांचा समावेश आहे. त्याशिवाय राज्यातील रस्ते अपघातांनीदेखील अनेकांचे जीव घेतले असून, अशा अपघातांत तब्बल १६५ लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत ४३४ लोक गंभीर जखमी झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत.
राज्यात १,४८० घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४८४ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून ७२० घरांना अंशतः हानी पोहोचली आहे. शेतकरी आणि फळउत्पादकांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. फक्त शेती व फलोत्पादन क्षेत्रालाच ३,७७,००० लाख रुपयांपेक्षा जास्त तोटा बसल्याचे सांगितले जात आहेत.
एकट्या मंडीमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कांगडा (३२), कुल्लू (२६) आणि चंबा (२१) या जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. रस्ते अपघातांच्या बाबतीत चंबा (२२ मृत्यू), मंडी (२४) आणि कांगडा (१९) हे जिल्हे सर्वाधिक धोकादायक ठरले आहेत. सार्वजनिक पायाभूत सुविधांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्रे, वीजपुरवठा आणि जलपुरवठा यांसह विविध यंत्रणांना ४,१२,२४६.९७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. सध्या राज्यातील ६१५ रस्ते पूर्णपणे बंद आहेत, त्यात चार राष्ट्रीय महामार्गांचाही समावेश आहे. केवळ कुल्लूमध्येच २२० पेक्षा जास्त रस्ते अडथळ्यांमुळे बंद झाले आहेत.
वीज आणि पाणीपुरवठा ही देखील मोठी समस्या बनली आहे. राज्यात १,७४८ वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) बंद पडले असून, यामध्ये एकट्या कुल्लूमधील १,५१२ ट्रान्सफॉर्मर सर्वाधिक बाधित झाले आहेत. शिमला, मंडी आणि कांगडा या जिल्ह्यांमध्येही पाणीपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असली तरी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस दल आणि स्थानिक यंत्रणा बाधित भागांमध्ये सतत काम करत आहेत. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, वीज व पाणीपुरवठा पुनर्नियोजित करणे आणि रस्ते वाहतूक सुरळीत करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तज्ज्ञांच्या मते, सततचा पाऊस सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, तसेच पुनर्बांधणीच्या कामात आणखी अडचणी येऊ शकतात. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि धोकादायक भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.