गुरुग्रामध्ये पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये जोरदार चकमक
पोलिसांच्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात चार आरोपी ठार
गुन्हेगारांच्या गोळीबारात तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही गोळ्या लागल्या
पुढील तपास सुरु
गुरुग्राममधील सुशांत लोक फेज-2 परिसरात गुरुवारी पोलिस आणि सशस्त्र गुन्हेगारांमध्ये झालेल्या चकमकीत चार आरोपी ठार झाले, तर एक आरोपी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला एका संशयित स्कॉर्पिओ कारमधून काही गुन्हेगार परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, सुशांत लोक परिसरात या गुन्हेगारांनी एका व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार केल्याचे समोर आले. संबंधित व्यावसायिकाला एका कुख्यात गँगस्टरकडून खंडणीसाठी सतत धमकीचे मेसेज आणि कॉल येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने परिसराला वेढा घालत आरोपींना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच आरोपींनी शरणागती पत्करण्याऐवजी पोलिसांवरच अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार करत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. काही काळ दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान पाचही आरोपींना गोळ्या लागल्या. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर चार आरोपींना मृत घोषित केले, तर एका आरोपीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी क्राइम आणि डीसीपी ईस्ट हे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच सीन ऑफ क्राइम आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)च्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गुन्हेगारांच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.