

पंढरपुरात 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्याची घोषणा केली.
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व सुविधा केंद्र उभारले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यांनी दिली आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.
गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी मुक्कामी सुविधा आजवर उपलब्ध नव्हती. ही समस्या लक्षात घेत मागील वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा भवन उभारण्याची घोषणा केली. याच घोषणेला मूर्त रूप देत यावर्षी गोवा भवनासाठी जमीन निश्चित करण्यात आलीय.
सरकारच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांना आता पंढरपूरमध्ये सुरक्षित, सुसज्ज आणि हक्काचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षीच्या आषाढी एकादशीपूर्वी हे भवन उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह गोव्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना प्रवासासाठी आर्थिक सहाय्य देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते 36 नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येनुसार १ लाख ते ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.
ही रक्कम नोंदणीकृत दिंडींना थेटपणे वितरित केली जाईल. या योजनेअंतर्गत किमान 40 वारकरी असलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना परतीच्या बस प्रवासासाठी आर्थिक सहाय्य तसेच इतर आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 3,500 वारकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. प्लास्टिकमुक्त वारीला प्रोत्साहन देण्यासाठी कापडी पिशव्या, पारंपरिक वारकरी वेशभूषा, औषधांचे संच (मेडिकल किट) तसेच वारीच्या मार्गावर निश्चित ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.