गुजरातमधील वलसाडमध्ये भावूक रक्षाबंधनाचा प्रसंग
मृत बहिणीचा प्रत्यारोपित हाताने भावाला राखी बांधली.
रिया मिस्त्री – जगातील सर्वात कमी वयाची ऑर्गन डोनर
अनमता अहमद – जगातील सर्वात कमी वयाची हात प्रत्यारोपण प्राप्त करणारी मुलगी
Raksha Bandhan : गुजरातमधील वलसाडमध्ये तिथली बीच रोडवर रक्षाबंधन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्षाबंधनाचा क्षण पाहून सर्वजण भावूक झाले होते. उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते, काहींच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. कारण, हा रक्षाबंधनाचा समारंभ वेगळाच होता. एका बहिणीचं वर्षभरापूर्वी निधन झाले होते, पण तिच्याच हाताने मोठ्या भावाला राखी बांधली होती. हा क्षण त्या भावाच्या डोळ्यातही अश्रू आणणारा होता. भाऊ आपले अश्रू रोखू शकला नाही. वलसाड आणि गुजरातमध्ये या भावनिक क्षणाची चर्चा झाली. हृदयाला भिडणारं नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात..
९ वर्षांच्या रिया मिस्त्री हिचे सप्टेंबर २०२४ मध्ये निधन जाले होते. पण तिचा उजवा हात आजही जिवंत आहे. रियाचा उजवा हात दुसऱ्या मुलीला अनमता हिला प्रत्यारोपण (ट्रांसप्लांट) करून बसवण्यात आला होता. त्याच अनमताने रियाचा मोठा भाऊ शिवमला राखी बांधली. शिवम आणि अनमता यांच्या रक्षाबंधनाचा हा हृदयस्पर्शी क्षण अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला.
खांद्यापर्यंत हात ट्रान्सप्लांट करणारी मुंबईमधील अनमता अहमद ही जगातील सर्वात कमी वयाची मुलगी आहे. अनमताचे वय १६ वर्ष आहे. डॉक्टरांनी अनमता हिला रियाचा हात लावलाय. रिया जगातील सर्वात कमी वयाची ऑर्गन डोनर होती. रियाचा हात अनमताला लावल्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये एक नातं तयार झालं. दोन्ही कुटुंब प्रेम, दु:ख, कृतज्ञता या बंधनात बांधले गेले.
अनमता हिने शिवमच्या मनगटावर राखी बांधली, पण त्या क्षणाला रियाच्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. रियाची आई तृष्णा डोळ्यातील अश्रूंना आवरत म्हणाली, जेव्हा अनमताने शिवमला राखी बांधली, तेव्हा आम्हाला वाटलं की रिया राखी बांधण्यासाठी जिवंत झाली आहे. मी तिच्या आवडीची मिठाई गुलाबजामून बनवले आहेत. आम्ही दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन साजरं केलं. आम्ही अजूनही मुलीच्या जाण्याच्या दुःखातून सावरलो नाही. पण अनमताल्या पाहून आनंद होतो. ती किती सुखी आहे आणि चांगलं आयुष्य जगत आहे, हे पाहून समाधान वाटतं.
अनमता मुंबईहून वलसाडला रक्षाबंधनासाठी पोहचली. त्यावेळी रियाच्या कुटुंबिय भावूक झाले होते. रियाच्या कुटुंबाने अनामताचा उजवा हात हातात घेतला. आई तर हात धरून रडत राहिली. भावानेही बहिणीच्या हाताला स्पर्श केला. वडीलही तिचा हात धरून शांत त्याकडे पाहत राहिले. कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
१५ सप्टेंबर २०२४ रोजी रिया हिला सूरतमधील किरण रूग्णालयात दाखल करण्यात आले. रियाला ब्रेन हेमरेज असल्याचे समजलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रिया ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूग्णालयातील डॉक्टरांनी ऑर्गन डोनेशनबाबत रियाच्या कुटुंबियांना सांगितले. कुटुंबियांनी होकार दिल्यानंतर रियाचे मूत्रपिंड, यकृत, एक हात, फुफ्फुसे आणि डोळ्यांचा बुबुळ काढून इतर रुग्णांना प्रत्यारोपणासाठी देण्यात आले. रियाचा हात मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात अनमता हिला ट्रांसप्लांट करण्यात आला.
ऑक्टोबर २०२२ मध्ये अनमता उत्तरप्रदेशमधील अलीगढ येते कुटुंबाकडे गेली तेव्हा एक दुर्घटना घडली. घराच्या टेरेसवर खेळत असताना विजेचा झटका लागला. दोन्ही हाताला गंभीर इजा झाली. हात भयंकर भाजले गेले होते. अनमता हिला गँग्रीन झाला होता. उजवा हात खांद्यापासून कापाला लागला होता, डावा हात सर्जरीनंतर व्यवस्थित झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.