

ईडीने AAP खासदार अशोक मित्तल यांच्या घरावर छापा टाकला
पंजाब, हरियाणा आणि गुरुग्रामसह ८ ठिकाणी कारवाई
आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून तपास सुरू
अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी पहाटे छापा टाकला. सूत्रांनुसार गुरुग्राम, पंजाब आणि हरियाणासह अंदाजे आठ ते नऊ ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत. यात अशोक मित्तल आणि त्यांच्या मुलाशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने अशोक मित्तल यांच्या जालंधर येथील निवासस्थानांवरही छापा टाकण्यात आला आहे.
लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या निधीशी संबंधित कथित अनियमिततेच्या प्रकरणात ही कारवाई केली गेली. दरम्यान एजन्सीकडून अद्याप कोणतेही सविस्तर अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीची पथके आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि नोंदींची कसून तपासणी केली जात आहे.
निधीचा प्रवाह आणि संभाव्य अनियमितता तपासण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तपासणी केली जातेय. दरम्यान राघव चड्ढा यांच्या जागी आम आदमी पक्षाने अशोक मित्तल यांची राज्यसभेत उपनेतेपदी नियुक्ती केली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर लगेचच झालेली ईडीची ही कारवाई राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जातेय.
दरम्यान या कारवाईनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष अमन अरोरा यांनी अशोक मित्तल यांच्यावरील छापेमारीचा संबंध राघव चड्ढा वादाशी जोडला आहे.
ते म्हणाले की, "ही कारवाई त्यांच्याशी म्हणजेच राघव चड्ढा संबंधित आहे. राघव चढ्ढा यांना उपनेतेपदावरून हटवून अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. जो कोणी भाजपच्या विरोधात उभा राहतो, त्याच्यावर कारवाई केली जाते."
अशोक मित्तल यांचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्यांच्या वडिलांनी 'लवली स्वीट्स' नावाचे एक छोटे मिठाईचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर अशोक मित्तल यांनी आपल्या भावांसोबत या व्यवसायाचा विस्तार केला. आणि ते जालंधरमधील सर्वात प्रसिद्ध मिठाईचे दुकान बनले आहे. मिठाईच्या व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी २००५ मध्ये 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'ची स्थापना केली. जी
आज देशातील सर्वात मोठ्या खासगी विद्यापीठांपैकी एक मानली जाते. अशोक मित्तल यांनी गुरु नानक देव विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे. तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.