

संजय गडदे, साम प्रतिनिधी
डायरेक्टोरेट ऑफ एनफोर्समेंट (ED) मुंबई झोनल कार्यालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठी कारवाई करत 33 स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे 16.95 कोटी इतकी आहे. ही कारवाई हिरेन भानू आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
ED ने ही चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या FIR च्या आधारे सुरू केली होती. या FIR मध्ये सुमारे 122 कोटींच्या बँक निधी अपहाराचा आरोप आहे. चौकशीत असे समोर आले की, NICB बँकेचे माजी जनरल मॅनेजर आणि हेड ऑफ अकाउंट्स हितेश प्रविणचंद्र मेहता यांनी अकाउंटिंग सिस्टीममध्ये फेरफार करून आणि खोटे व्यवहार दाखवून बँकेचे पैसे हडप करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी दीर्घकाळ पैसे काढल्याची कबुलीही दिली आहे.
तपासात असेही आढळले की हे सर्व व्यवहार बँकेचे माजी चेअरमन आणि व्हाइस चेअरमन हिरेन रंजीत भानू यांच्या सांगण्यावरून करण्यात आले. हिरेन भानू यांनी अनेक वर्षे बँकेच्या कामकाजावर थेट आणि अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवले होते. त्यांच्या पत्नी गौरी भानू, ज्या काही काळ बँकेच्या कार्यवाहक चेअरमन आणि व्हाइस चेअरमन होत्या, त्यांनाही या गैरव्यवहारातील पैशांचा फायदा झाल्याचे ED ने म्हटले आहे. हिरेन भानू दाम्पत्याने किमान 26 कोटींचा गैरव्यवहारातील पैसा घेतल्याचा आरोप आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिरेन भानू यांनी काही कर्जदारांच्या संगनमताने परदेशातील कंपन्या कोणतेही पैसे न देता आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्या कंपन्यांच्या खात्यात भारतातून कर्जाच्या पैशांचा प्रवाह वळवला. NICB बँकेने ज्या कर्जदारांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले होते, त्यांच्यामार्फत हे व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात आधीच आरोपपत्र दाखल केले असून हिरेन भानू यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट आणि जाहीर नोटीसही जारी करण्यात आली आहे. सध्या आरोपी भारताबाहेर असून त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही, असेही ED ने सांगितले.
या प्रकरणात बँकेमधून वळवण्यात आलेला पैसा नेमका कुठे गेला याचा पुढील तपास सुरू असून, या घोटाळ्यामुळे बँक आणि ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे ED चे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.