उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार राहिलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकशाही सेनानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन समर्पित कार्यकर्ते दादा तेजभान सिंह यांचे शनिवारी वयाच्या 83 व्या वर्षी लखनऊ येथील मॅक्स रुग्णालयात निधन झाले. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अमेठीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत सार्वजनिक जीवनातील मोठी हानी असल्याचे म्हटले आहे. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त केला.
जामो विकासखंडातील अचलपूर गावचे रहिवासी असलेले दादा तेजभान सिंह यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक म्हणून केली होती. आपत्कालीन काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यामुळे त्यांना सुमारे आठ महिने कारावास भोगावा लागला होता. त्यामुळे त्यांना लोकशाही सेनानी म्हणूनही सन्मानाने ओळखले जात होते. जनसेवेला त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले.
दादा तेजभान सिंह हे प्रथम 1977 साली जनता पक्षाच्या तिकिटावर गौरीगंजमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1991, 1993 आणि 1996 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सलग तीन वेळा विजय मिळवत त्यांनी आपली राजकीय पकड सिद्ध केली. अमेठी जिल्ह्यात भाजपच्या संघटनाला बळकट करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते.
स्मृती इराणी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 2014 मध्ये अमेठीतून प्रथमच लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तेव्हा दादा तेजभान सिंह प्रत्येक टप्प्यावर मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांचे प्रेम, मार्गदर्शन आणि संघटनेवरील अढळ विश्वास हा त्या निवडणुकीपासून आजपर्यंत मला सतत बळ देणारा ठरला. अमेठीच्या भूमीत त्यांच्यासारखा समर्पित कार्यकर्ता आणि आत्मीय मार्गदर्शक लाभणे हे माझे भाग्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.