पवन खेरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
पासपोर्ट आरोप प्रकरणात कायदेशीर अडचणी वाढल्या
न्यायालयाने दिलासा देण्यास नकार
पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष
आसामच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नींकडे अनेक पासपोर्ट असल्याचा आरोप केल्या प्रकरणात पवन खेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुवाहाटी उच्च न्यायालय यांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्याने खेरा यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खेरा यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुयान सरमा यांच्याकडे अनेक पासपोर्ट असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्यांच्या विरोधात गुवाहाटी गुन्हे शाखेत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी खेरा यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. त्यांनी न्यायालयाकडे काही दिवसांची मुदत देण्याची विनंतीही केली होती, जेणेकरून ते आसाममधील स्थानिक न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतील. मात्र, न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती पार्थिव ज्योती सैकिया यांच्या एकल खंडपीठासमोर झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सुमारे तीन तासांहून अधिक काळ ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला. खेरा यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बाजू मांडली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, खेरा देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाही आणि त्यांच्या अटकेची गरज नाही. तसेच, या प्रकरणामागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, आसामचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी देवजित लोन सैकिया यांनी खेरा यांना कोणताही दिलासा देण्यास विरोध केला. त्यांच्या मते, हे प्रकरण केवळ मानहानीपुरते मर्यादित नसून, त्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे खेरा यांना अंतरिम संरक्षण देणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर खेरा यांना अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.