कांगोमध्ये लष्करी विमानाचा भीषण अपघात
भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू
हे विमान किक्विटहून राजधानी किंशासाकडे परतत असताना केंगे परिसरात कोसळले
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती
कांगोमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लष्करी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. कांगोच्या लष्कराने शुक्रवारी या दुर्घटनेची अधिकृत माहिती दिली. या घटनेमुळे देशाच्या सुरक्षा यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टिनेंट जनरल मुतोम्बो कातालायी तिएंदे आणि लेफ्टिनेंट जनरल बाकुमी लिकुलिया यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तिएंदे हे कांगोच्या सैन्य न्यायालयाचे प्रमुख होते, तर लिकुलिया हे सशस्त्र दलाचे ऑडिटर जनरल म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
कांगोच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल एफोमी एकेंगे यांच्या म्हणण्यानुसार , या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रतिनिधी मंडळातील 12 सदस्य आणि विमानाच्या क्रू सदस्यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला. विमानात प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दक्षिण-पश्चिम कांगोतील किक्विट शहरातून राजधानी किंशासाकडे परतत होते. प्रवासादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विमान केंगे परिसरात कोसळले. विमान दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. कांगोच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या बोर्डाचे अध्यक्ष ट्रायफॉन किन-कीए मुलुंबा यांनीही दुर्घटनेमागील कारण अद्याप समोर आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.