

NEET paper leak | CBI Inquiry : सीबीआय चौकशीत एक मोठा खुलासा झाला असून नीट (NEET) परीक्षेचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेल्याचे उघड झाले आहे. यात सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली असून राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या (CBI) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि त्यांच्या डिजिटल उपकरणांच्या (Gadgets) तपासणीतून ही माहिती समोर आली आहे.
सीबीआयच्या मते, पुढील आरोपींच्या अटकेनंतर पेपरफुटीचे हे प्रकरण अधिक मोठे असण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे नक्की किती विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला, याचा अचूक आकडा अद्याप निश्चित करता आलेला नाही. चौकशीत असेही समोर आले आहे की, काही पालकांनी स्वतः पेपर विकत घेतल्यानंतर तो पुढे इतर लोकांनाही विकला होता.
सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरच्या प्रती (झेरॉक्स) काढून विकल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे हा पेपर नेमका किती लोकांपर्यंत पोहोचला, याचा शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे. आतापर्यंतच्या चौकशीनुसार, या पेपरफुटीचे मुख्य केंद्र महाराष्ट्र होते. येथूनच राजस्थान आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘प्रश्न बँक’ (Question Bank) पोहोचली.
CBI कडून पैसे देणाऱ्यांची यादी तयार
आता केवळ पेपर फोडणारे दलाल आणि मुख्य सूत्रधारच नव्हे, तर मोठी रक्कम देऊन पेपर विकत घेणारे प्रभावशाली पालकही केंद्रीय तपास यंत्रणेच्या थेट निशाण्यावर आहेत. तपास यंत्रणा आता अशा सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांच्या बँक खात्यातून शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारे (पुणे) यांच्या खात्यात पैसे वर्ग (Transfer) झाले होते.
यंत्रणेने पेपर लीक करणारे आणि त्यांची विक्री करणारे बहुतांश मोठे चेहरे उघडकीस आणले आहेत. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) व्यतिरिक्त बाहेरील काही संशयित व्यक्ती अजूनही रडारवर आहेत. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सीबीआयची दोन पथके (Teams) कार्यरत आहेत.
दुसरीकडे, या साखळीतील पुढील कडी म्हणजेच पेपर खरेदी करणारे पालक आणि विद्यार्थ्यांची धरपकड करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. बुधवार रात्री महाराष्ट्रातून या कारवाईची सुरुवात झाली असून, सीबीआय लवकरच इतर राज्यांमध्येही छापे टाकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.