

Suvendu Adhikari PA Chandranath Rath murder case : पश्चिम बंगालच्या निवडणुका संपताच राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळलाय. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची रस्त्यात अडवून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांची कार आडवली. त्यानंतर १० राऊंड धाडधाड गोळ्या झाडल्या. त्यामधील ५ गोळ्या रथ यांच्या शरीरात आरपार घुसल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर आता पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणखी उसळण्याची शक्यता आहे. रथ यांच्या हत्येमागे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, लोकशाहीत हिंसाचार आणि राजकीय हत्यांना स्थान नाही. दोषींना ओळखून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
पश्चिम बंगालमधील मध्यमग्रामच्या दोहरिया परिसरात रात्री सुवेंदूअधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ आपल्या कारमधून जात होते. चालक गाडी चालवत होता तर ते बाजूच्या सीटवर बसले होते. चंद्रनाथ यांच्या गाडीचा दुसरी गाडी काही वेळांपासून पाठलाग करत होते. अचानक त्या कारने ओव्हरटेक केले अन् पुढे आली. बाजूने बाईकवर आलेले गुन्हेगारांनी चंद्रनाथ यांच्यावर १० राऊंड फायर केल्या. त्यामधील ५ गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत लागल्या.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकालात भाजपने विजय मिळवला. भाजपच्या विजयानंतर राज्यात हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्याचे समोर आले. पण बुधवारी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए आणि निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने या हिंसाचारात आणखी वाढ झाली. चंद्रनाथ अनेक वर्षांपासून सुवेंदू यांच्यासोबत काम करत होते. दोहरिया भागातील एका रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला झाला. अनेक गोळ्या लागल्याने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमुळे बंगालमध्ये राजकीय गदारोळ माजला असून परिसरातील तणाव वाढला आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ यांची हत्या हा पूर्वनियोजित कट होता. चंद्रनाथ यांच्या गाडीचा पाठलाग एक चारचाकी आणि एक मोटारसायकल करत होती. पाठलाग करणाऱ्या गाडीने चंद्रनाथ यांच्या गाडीला ओव्हरटेक केले. त्यामुळे गाडीचा वेग कमी करावा लागला. काही क्षणात बाईकवरील हल्लेखोरांनी अगदी जवळून १० राऊंड फायर केल्या. त्यापैकी ५ गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत, पोटात आणि डोक्यात लागल्या.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, हल्ल्यात वापरलेल्या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे. या घटनेचे वर्णन करणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, कोणीतरी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडीचा वेग कमी झाल्यावर गोळीबार केला. गोळीबारात वाहनाचा चालकही जखमी झाला आहे. त्याच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि जिवंत गोळ्या जप्त केल्या. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्धार्थ नाथ गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित एक वाहन जप्त करण्यात आले आहे. गाडीच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार करण्यात आला होता. आम्ही वाहन जप्त केले असून त्यातून काडतुसे जप्त केली आहेत. अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. त्याशिवाय स्थानिक साक्षीदारांचीही चौकशी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.