

पंजाबमध्ये रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर हल्ला
बटालाजवळ रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर दगडफेक
रवनीत बिट्टू यांनी आप कार्यकर्त्यांवर केले गंभीर आरोप
भाजपच्या नशा मुक्त पंजाब यात्रेदरम्यान घडली घटना
पंजाबमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या ताफ्यावर आम आदमी पक्षाच्या (AAP) कार्यकर्त्यांनी दगड, अंडी आणि टोमॅटो फेकून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बटाला परिसरात ते भाजपच्या 'नशा मुक्त पंजाब यात्रे'साठी जात असताना सुमारे १०० हून अधिक 'आप' कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा दावा बिट्टू यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट गाड्यांच्या आणि जॅमर वाहनांच्या काचा फुटून वाहनांचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून रवनीत बिट्टू यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पोलिस महासंचालकांना (DGP) या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे. "जर माझ्या किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या जिवाचे काही बरे-वाईट झाले, तर त्याला पूर्णपणे मान सरकार जबाबदार असेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकाराची माहिती बिट्टू यांनी तातडीने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली असून, भाजपच्या नशाविरोधी मोहिमेला घाबरूनच सत्ताधाऱ्यांनी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रवनीत बिट्टू यांनी आरोप केला की, या हल्ल्यामागे आम आदमी पार्टीशी संबंधित व्यक्तींचा हात होता. त्यांनी स्थानिक 'आप' आमदाराच्या समर्थकांवर भाजपच्या अंमली पदार्थ विरोधी मोर्चात सहभागी होण्यापासून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. रवनीत बिट्टू यांनी या घटनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांच्याशी बोलणं झालं असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, जर त्यांना काही झालं तर पंजाब सरकार आणि पोलिस प्रशासन जबाबदार असेल.
रवनीत सिंग बिट्टू यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर भाजप नेते सुनील जाखर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'मला हे अत्यंत दुर्दैवी वाटते. हा फक्त रवनीत बिट्टूचा प्रश्न नाही. आज सकाळी अमृतसरमध्ये रात्रीच्या गस्तीदरम्यान एका एएसआयची हत्या झाली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची हत्या केली. बिट्टू यांच्यावरील हल्ला राजकीय हेतूने करण्यात आला आहे. पंजाबमधील परिस्थिती अस्थिर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम आदमी पार्टीचे सरकार, किंवा खरे तर भगवंत मान, कोणत्या प्रकारचे बीज पेरत आहेत ते पाहा. माझा विश्वास आहे की भगवंत मान केवळ एक कठपुतळी आहेत. केजरीवाल आणि सिसोदिया खरी भूमिका बजावत आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.