बांगलादेशात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती आणि भूस्खलन
या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू
सात जिल्ह्यांमध्ये पूराचा मोठा फटका
सैन्य आणि नौदलाकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर
मान्सून जगभरात दाखल झाला असून अनेक ठिकाणी पावसाच्या कोसळधार सुरु आहेत. बातमी आहे बांगला देशातून, बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या या पूरस्थिती आणि भूस्खलनामध्ये आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील १० लाखांहून अधिक नागरिकांचा जीव धोक्यात असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बांगलादेशच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, चट्टोग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, रांगामती, खगराचारी, मौलवीबाजार आणि हबीगंज या सात जिल्ह्यांमध्ये पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
हजारो कुटुंबांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला असून सुमारे २ लाख ६७ हजार ९१८ घरांचं पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालं आहे. पूरामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
बांगलादेशचे सैन्य आणि नौदल पूरग्रस्त भागांमध्ये बोटींच्या माध्यमातून अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तू पोहोचवत आहेत. तसेच सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्याचे कामही सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.