

देशाला हादरवून टाकणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर देणगीत झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देणगी व्यवस्था आणि बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. मंदिराच्या बँक खात्यांचे व्यवहार एका व्यक्तीऐवजी तीन अधिकृत हस्ताक्षर करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून केले जाणार आहेत. तसेच दानपेटीत देणगीरुपात मिळालेल्या पैशांच्या मोजणी अशा सर्व प्रक्रियेत सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून, पोलीस देखील तैनात असणार आहेत.
राम मंदिर ट्रस्टने बँक खात्यांच्या व्यवहार व्यवस्थेतही बदल केला आहे. कार्यकारी महासचिव कृष्ण मोहन यांच्यासह दोन सहकारी जगदीश आणि चंदन राय यांच्या स्वाक्षरी देखील अधिकृत करण्यात आली आहे. नव्या व्यवस्थेनुसार, मंदिराच्या बँक खात्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीसाठी या तिन्ही व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या बंधनकारक राहतील. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीच्या सहीने बँकिंगसंबंधी प्रकिया पूर्ण होणार नाही.
आतापर्यंत बँकिंग व्यवस्थेची जबाबदारी ट्रस्टी अनिल मिश्रा यांच्याकडे होती. बँक खात्याशी संबंधित व्यवहार करताना त्यांची स्वाक्षरी ग्राह्य धरली जात होती. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी यांची डिजिटल स्वाक्षरी वापरली जात होती. ही नवी व्यवस्था म्हणजे आर्थिक पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक वाढवण्याच्या दृष्टीने उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे.
देणगी प्रक्रियेशी संबंधित सुरक्षाव्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. देणगी मोजणीच्या ठिकाणी एकूण ४३ जण असणार आहेत. विविध स्तरांवर देखरेख ठेवली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यासाठी १३ अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी यापूर्वी सीसीटीव्ही नव्हते, तेथेही कॅमेरे लावले आहेत. दानपेटी आणि पैशांची मोजणी या प्रक्रियेवर कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
नव्या व्यवस्थेनुसार, दानपेटीतील पैसे मोजणीच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी २७ एसआयएस सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. याशिवाय पोलीस दलही असणार आहे. या दरम्यान ठिकठिकाणी पोलीस असणार आहेत. विशेषतः ३४ क्रमांकाच्या ठिकाणी तीन अतिरिक्त पोलीस तैनात केले जाणार आहेत. या ठिकाणी गुप्त दानपेटी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.