

देशातील 14 राज्यांतील 58 अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले.
नियमांचे उल्लंघन आणि विद्यार्थ्यांच्या कमी प्रवेशामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
950 हून अधिक तांत्रिक अभ्यासक्रमही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पाहतात, परंतु या क्षेत्राबाबत एक धक्कादायक बातमी समोर आलीय. 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन'च्या (AICTE) एका अहवालानुसार, २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. यासह विविध संस्थांमध्ये चालवले जाणारे ९५० हून अधिक तांत्रिक अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक महाविद्यालये बंद
सरकारी आकडेवारीनुसार महाविद्यालये बंद पडण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर आहेत. या दोन राज्यांत सर्वाधिक इंजिनिअरिंग महाविद्यालये आहेत. दोन्ही राज्यात १२—१२ कॉलेज बंद पडली आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. येथील ८ महाविद्यालये बंद पडली आहेत. तर पंजाब आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी ४ महाविद्यालये बंद झाली.
यासह राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन, तसेच गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन संस्था बंद करण्यात आल्या आहेत. हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि ओडिशामध्येही प्रत्येकी एक महाविद्यालय बंद करण्यात आले आहे. बंद पडलेल्या ५८ संस्थांपैकी तीन संस्थांना सरकारी अनुदान मिळत होते, तर उर्वरित सर्व खासगी महाविद्यालये आहेत.
AICTE च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ही महाविद्यालये बंद करण्यामागे अनेक प्रमुख कारणे आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचे प्रमाण कमी असणे हे आहे. तसेच अनेक संस्थांमध्ये पात्र प्राध्यापक नव्हते. अनेक महाविद्यालये नियमांनुसार पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा उभारण्यात अपयशी ठरली होत्या. ज्यामुळे नियामक प्राधिकरणाला हे कठोर पाऊल उचलावे लागले.
या महाविद्यालयांमध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होईल?असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.यावर एआयसीटीईने स्पष्ट केले की, ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ (टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या) योजनेअंतर्गत या संस्था बंद केल्या जात आहेत. याचा अर्थ म्हणजे, ही महाविद्यालये आता प्रथम वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. मात्र, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा अंतिम वर्षात आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा कोणताही परिणाम होणार नाही; ते त्याच महाविद्यालयात आपली पदवी पूर्ण करू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.