

विरारमध्ये तलावात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडाला
मुसळधार पावसामुळे तलावात पाणी जास्त होते
विरारमध्ये १९ वर्षीय तरुणाचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. विरार पूर्वेकडील कुंभारपाडा येथे ही घटना घडली. पोहण्यासाठी मित्रांसोबत तलावात गेलेला १९ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. अभिषेक महेंद्र राजभर (वय १९ वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. हा तरुण विरारच्या रिद्धी- सिद्धी इमारतीत कुटुंबीयांसोबत राहत होता.
अभिषेक आपल्या दोन मित्रांसह गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुंभारपाडा तलावात पोहण्यासाठी उतरला होता. परिसरात होणारा मुसळधार पाऊस, तलावाची वाढलेली पाणीपातळी आणि रात्रीचा अंधार यामुळे बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी रात्री ही शोधमोहीम थांबवावी लागली.
शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरू करून पाण्यात बुडालेल्या अभिषेक याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विरार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.
तर भाईंदरच्या राई गावात धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या राहुल अशोक पाटील ( वय ३५ वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी संबंधित ठेकेदार, देखभाल संस्था किंवा जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.