संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी
Kalyan stray dog news : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसरात भटक्या कुत्र्याने अक्षरशः तांडव माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप हॉटेल ते खडकपाडा या मार्गावरून ये-जा करणाऱ्या तब्बल १२० ते १३० नागरिकांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट निर्माण झाली आहे.
या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बहुतांश नागरिकांना तात्काळ महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एका ११ वर्षांच्या अंकिता नावाच्या चिमुकलीवरही या कुत्र्याने भीषण हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली असून, रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. संदीप पगारे यांनी दिली.
केडीएमसी प्रशासनाचा हलगर्जीपणा ऐरणीवर
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि नियंत्रणासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र, तरीही भटक्या कुत्र्यांचा उच्छाद कमी करण्यात केडीएमसी प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
रुग्णालयातही भटक्या कुत्र्यांचा वावर
एकीकडे कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींवर उपचार सुरू असताना, दुसरीकडे महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातच भटके कुत्रे बिनधास्त फिरत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. सध्याही रुग्णालयात हीच बिकट परिस्थिती असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन या जीवघेण्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार? असा संतप्त सवाल कल्याणकर उपस्थित करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.