पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांची आज निकालाची प्रतीक्षा संपली. अनेक विद्यार्थ्यांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष होतं. त्यानंतर आज सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागलाय. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. या परीक्षेत पुण्यातील तिघांनी १०० टक्के गुण मिळवण्याचा पराक्रम केला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आज दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंडळाच्या ९ विभागीय मंडळाकडून परीक्षा घेण्यात आला होता. राज्यात १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर यंदा १.९८ टक्क्यांनी निकाल वाढला. यावेळी देखील कोकण विभागाने बाजी मारली. याचदरम्यान , पुण्यातही तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविण्याचा विक्रम केला.
पुण्यातील श्रृजा घाणेकर, प्राजक्ता नाईक आणि कैवल्य देशपांडे या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवल्यानंतर या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
१०० टक्के गुण मिळवणारी श्रृजा घाणेकर म्हणाली, 'मला खूप मस्त वाटत आहे. मी मोठ्या कष्टाने अभ्यास केला. त्याचं फळ मला मिळालं आहे. माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे. तिलाही १०० टक्के मिळाले आहेत'. प्राजक्ता नाईक म्हणाली की, 'मला १०० टक्के मिळाले आहेत. मला खूप छान वाटतंय. मी केलेल्या अभ्यासाचं सार्थक झाल्याचं वाटतंय'.
कैवल्य देशपांडे या विद्यार्थ्याने देखील १०० गुण मिळवले आहेत. कैवल्यने म्हटलं की, 'मी खूप प्रतीक्षा केली होती. आज अखेर निकाल लागला. मला ९७ टक्के मिळाले. तसेच कला विषयाचे जोडून ३ टक्के असे एकूण १०० टक्के मिळाले आहेत. माझं सुरुवातीपासून १०० टक्के गुणाचं ध्येय होतं. ते आज पूर्ण झालं'.
राज्यात एकूण एकूण १८७ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यापैकी १२३ विद्यार्थी लातूरमधील आहेत. त्यामुळे लातूर पॅटर्नची जोरदार चर्चा होत आहे. या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात गेल्या वर्षी १५१ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते. तर २०२२ साली १२२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते. त्यापैकी ७० विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.