

Shiv Sena UBT Samna editorial reaction : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांचा निकाल समोर आला. राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह नवी मुंबई आणि पनवेलमध्येही भाजपची एकहाती सत्ता आली. ठाकरेंच्या मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. मुंबईमध्ये तब्बल २५ वर्षानंतर सत्तांतर झाले, भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना विजयाचे गणित जुळवता आले नाही. भाजपने शिंदेंच्या साथीने सत्तेचा दरवाजा तोडला. यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सामना अग्रलेखात शिवसेनेकडून महापालिकांच्या निकालावर वक्तव्य करण्यात आले आहे. मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत ‘अदानी’धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपने पाहिले अन् शिंदेंच्या बेइमानीमुळे पूर्ण झाले. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईचा घास शिंद्यांसारख्या माणसाच्या बेइमानीमुळे हातचा जाण्याची वेळ आली, पण आम्ही ते होऊ देणार नाही, असे मुखपत्रात म्हटलेय.
महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे, मुंबई शहराचे भवितव्य काय? येथील मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे येणारा काळच देईल, पण ज्यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पीछेहाटीस हातभार लावला, त्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला. मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना व मनसेने झुंज दिली, शर्थ केली. अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. मुंबई व मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलेय.
लाटांना आणि लहरींना काहीच अर्थ नसतो -
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराकडे भारताचे लक्ष लागले होते. प्रचंड भ्रष्टाचार, शाई घोटाळा, ईव्हीएम घोटाळा, पैसे वाटप, बोगस आणि दुबार मतदानाच्या ताकदीवर उद्योगपती अदानी यांचा भाजपच्या मदतीने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. संपूर्ण निकाल येण्याआधीच भाजपने सुरू केलेला जल्लोष हा निवडणूक घोटाळ्याचाच भाग आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी हा धोक्याचा इशारा आहे. सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोग हरकाम्याची भूमिका बजावत असेल तर निवडणुकीत कोणाही ऐऱ्यागैऱ्याची लाट येऊ शकते. या लाटांना आणि लहरींना काहीच अर्थ नसतो. मुंबईसह 26 महानगरपालिकांत भाजपची लाट आली व त्या लाटेवर ‘शहासेना’सारखे ‘हवशे-गवशे’ किनाऱ्याला लागले. ‘ना विचार ना भूमिका’ हेच सूत्र असल्याने यापुढे कोणत्याही निवडणुकांना अर्थ राहणार नाही, असेही अग्रलेखा म्हटलेय.
अजित पवारांचे घड्याळ बंद पडले
भाजप व त्यांच्या शिंदेंनी जिंकलेल्या जागा जर चोरून, विकत घेऊन मिळवल्या असतील तर मुंबई विकण्याची आणि विकत घेण्याची योजना तडीस नेण्याचा गौतम अदानी, अमित शहा व त्यांच्या भाजपचा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. ठाण्यात शिंदे, छत्रपती संभाजीनगरात भाजप, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, धुळे येथे भाजपने महापालिका ताब्यात घेतल्या. अजित पवारांचे घड्याळ बंद पडले. लातुरात काँग्रेस-वंचितने सत्ता मिळवली. काँग्रेस व वंचितने या निवडणुकांत सवतासुभा केला, पण मुंबईत त्यांना 25चा पल्लाही पार करता आला नाही. डॉ. आंबेडकर हे अखंड महाराष्ट्राचे व मुंबई मराठी माणसाच्याच हाती राहावी या ठाम मताचे होते. त्यांचे राजकीय वारसदार प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. काँग्रेस-वंचित आघाडीने लातूर सोडले तर मोठे यश मिळवले नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यात भाजपने मुसंडी मारली हे चित्र विचार करायला लावणारे आहे, असेही अग्रलेखात म्हटलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.