विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
Revas Karanja Sea Bridge, Mumbai Alibaug Travel : मुंबईहून अलिबागला पोहोचण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रेवस-करंजा समुद्री पुलाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस यांना धरमतर खाडीवरून जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून सुरू असलेला हा प्रकल्प नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण १० किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या समुद्री पुलाचा समावेश आहे. या पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे ४५ मीटर असणार आहे. 'केबल-स्टेड गर्डर' तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे पुलाखालून मोठ्या मालवाहू जहाजांनाही सहजपणे ये-जा करता येणार आहे.
या प्रकल्पाच्या मार्गात सुमारे ६.५ हेक्टर खारफुटीचे क्षेत्र येत आहे. पर्यावरणाची कमीत कमी हानी व्हावी, यासाठी या भागात उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाची संकल्पना १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात मांडण्यात आली होती. गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी उरणचे भाजप आमदार महेश बालदी गेल्या दहा वर्षांपासून मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
रेवस-करंजा समुद्री पुलामुळे अलिबाग, उरण, पनवेल आणि मुंबई यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. तसेच जेएनपीए बंदर, अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना अधिक चांगली जोडणी (कनेक्टिव्हिटी) मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच आयात-निर्यात व्यापार, मालवाहतूक आणि स्थानिक रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.