

Rahul Gandhi PM Modi remarks defamation case Maharashtra : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयानं जोरदार झटका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथितरित्या 'कमांडर इन-थीप' आणि 'चोरों का सरदार' यांसारखी टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीची तक्रार एका भाजप कार्यकर्त्याच्या वतीने दाखल करण्यात आली होती. ती रद्द करण्याकरिता गांधींच्या वतीने याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आज, मंगळवारी ती याचिका फेटाळून लावली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने या प्रकरणात मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून बजावलेल्या समन्सच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ही तक्रार सुनावणीयोग्य नसल्याचा तर्क या याचिकेत देण्यात आला होता. भाषणात टिप्पणी करताना कोणाचेही नाव घेतले नव्हते आणि कोणतीही ओळख पटेल किंवा कोणत्याही विशेष वर्गाचं नावही घेण्यात आले नव्हते, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.
राहुल यांच्या याचिकेत केलेला हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य केला नाही. भाजप राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. दरम्यान, राहुल यांनी २०१८ च्या एका सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना ही वादग्रस्त टिप्पणी केली होती.
राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजप कार्यकर्ता महेश श्रीश्रिमल यांनी तक्रार दाखल केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे केवळ पंतप्रधानच नाहीत, तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला होता. ही तक्रार रद्द करण्यासाठी राहुल यांच्या वतीने दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राहुल यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात मानहानीच्या प्रकरणावरील कार्यवाही सुरूच राहणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात महाराष्ट्रात इतर ठिकाणीही मानहानीचे खटले दाखल आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी न्यायालयातही त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल आहे. आरएसएसचे स्थानिक स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारसभेत आरएसएसवर आरोप केला होता. या प्रकरणीही राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या वक्तव्यामुळे संघाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.