सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणेकरांवर दिवाळीनंतर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहराला मंजूर झालेला पाणीसाठा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. मात्र, पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत भिमाले यांनी शहराच्या पाणीप्रश्नाबाबत भूमिका मांडली. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये सध्या ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेसाठी १३ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६.३५ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून, ३० जून २०२७ पर्यंत शहरासाठी ७.१५ टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज पाहता हा साठा अपुरा पडण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात पुणेकरांची पाणी कपात होऊ नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत पाणीपुरवठा नियमित राहणार आहे. मात्र, दिवाळीनंतर आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करावी लागू शकते, असे भिमाले यांनी सांगितले.
पुणेकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे आणि शहरासाठी १३ टीएमसी पाण्याचा कोटा कायम राहावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आवश्यक मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.