अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्यापासून परावृत्त करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी एक संवेदनशील आणि तेवढाच अनोखा उपक्रम आज राबवण्यात आला. पुणे शहर पोलिसांच्या वतीने आज ५० अल्पवयीन म्हणजेच विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी सिंहगड किल्ल्यावर दुर्गभ्रमण, समुपदेशन आणि पुनर्वसन मार्गदर्शनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा उद्देश विधी संघर्षग्रस्त बालकांकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता, त्यांच्या सुधारणा, पुनर्वसन आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा होता. पुणे शहर पोलिस दलातील परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखरेखीखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
उपक्रमांतर्गत बालकांना सिंहगड किल्ल्यावर नेऊन दुर्गभ्रमण घडविण्यात आले. इतिहासाची प्रेरणादायी ओळख करून देतानाच जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश देण्यात आला. गुन्हेगारीचा मार्ग सोडून शिक्षण, कौशल्य आणि प्रामाणिक कष्टाच्या बळावर सन्मानाने जीवन जगण्याचे महत्त्व पोलिस अधिकाऱ्यांनी मुलांना पटवून दिले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी बालकांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या विविध संधी, कौटुंबिक मूल्ये आणि गुन्हेगारीमुळे भविष्यात होणारे गंभीर दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, मात्र प्रत्येकाला स्वतःमध्ये बदल घडवून नव्याने आयुष्य उभारण्याची संधी असते, हा सकारात्मक संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.
कायद्याची अंमलबजावणी आणि गुन्हेगारीविरोधातील कारवाई ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असली तरी बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, समुपदेशन आणि पुनर्वसन तितकेच महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. अल्पवयीन मुलांना त्यांच्या चुका समजावून सांगत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामावून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी या उपक्रमातून केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.