

पुण्यात विषारी दारू प्रकरणाने खळबळ
विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा पोहोचला २२ वर
मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून मदत जाहीर
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणाने खळबळ उडाली आहे. दोन्ही शहरात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. पुण्यात विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा आता थेट २२ वर पोहोचला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि उरूळी कांचन भागात अनेकांचे बळी गेले आहेत. या प्रकरणानंतर शासनाकडून कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. तसेच विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, उरूळी कांचन, हडपसर भागातील काही नागरिकांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे. पुण्यातील उरळी कांचनमधील उमेश अवचर नावाच्या ३२ वर्षांचा रिक्षा चालकाचा देखील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर उमेशला अंधत्व आलं. त्याचबरोबर मळमळ आणि हायपर टेन्शनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर थोड्यावेळाने तोंडात फेस येऊन मृत्यू झाला. त्याने मृत्यूच्या आधी दोन दिवसांपूर्वी दारू प्यायली होती.
राधेश्याम प्रजापतीने उरळी कांचनमधील परिसरात दारू तयार केली होती. त्याच भागातील दारूच्या अड्ड्यावर उमेशने दारू प्यायली होती. विषारी दारूमुळे मृत्यूचं लोण आता पिंपरी-चिंचवड, पुणे या दोन शहारांपाठोपाठ उरळी कांचनमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
विषारी दारू प्रकरणावरून शिवसेना आक्रमक
पुण्याच्या हडपसर, पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्याने निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी आक्रमक भूमिका घेत घेतली. आज शिवसैनिकांसह कृष्णा नगर, तरवडे वस्ती, पोलीस चौकी पाठीमागील परिसर, साठे वस्ती येथे सुरू असलेल्या सुमारे 8/10 अवैध दारूभट्ट्यांवर धडक कारवाई करत उध्वस्त केल्या.
विषारी दारूकांडावरून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आक्रमक
पिंपरी-चिंचवड भागातील फुगेवाडी परिसरात मागील 40 वर्षापासून अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू होता. स्थानिक नागरिक वारंवार याची माहिती पोलीस विभागाला देत होते, तरीसुद्धा कारवाई का झाली नाही, असा संतप्त सवाल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केलाय.
मृतांच्या नातवाईकांना प्रशासनाकडून मदत जाहीर
पिंपरी- चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे गावठी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आली. याबाबतची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. तसेच शासनाने मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी, असं आवाहन केलं आहे. तसेच शहरातील गावठी दारू बनवणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दिल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.