वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी ज्याप्रमाणे आपल्या वडिलांच्या नावामध्ये बदल केला होता. तसाच बदल त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपल्या वडिलांच्या नावामध्ये केला आहे. बारामती तालुक्यात खेडकर कुटुंबीयांच्या नावावर जमीन आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावरील वडिलांचे नाव दिलीप खेडकर यांनी बदलल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात खेडकर कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे १४ गुंठे जमीन खरेदी केली होती. दिलीप खेडकर यांनी या जमिनीच्या सातबाऱ्यावर आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर या नावाऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे. त्यामुळे दिलीप खेडकर यांनी देखील मुलीप्रमाणेच नावामध्ये बदल करत फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे दिलीप धोंडीबा खेडकर आणि दिलीप कोंडिबा खेडकर कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दिलीप कोंडीबा खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली होती. त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. वागळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याची माहिती पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली होती. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड देखील लावला आहे. दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. आता सातबाऱ्यावर वडिलांच्या नावामध्ये बदल करत कोंडीबा केले आहे.
पूजा खेडकर यांना डिपार्टमेंट ऑफ परसोनेल अँड ट्रेनिंग विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. २ ऑगस्टपर्यंत नोटीसला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांच्या ईमेल तसेच रहिवासी पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली आहे. मसुरी येथील लाल बहादुर शास्त्री ट्रेनिंग अकादमीमध्ये हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना बजावले गेले होते. मात्र त्याठिकाणी सुद्धा त्या हजर झालेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर अद्याप नॉट रिचेबल आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.