राजेंद्र नगर कोचिंग सेंटर प्रकरणात (Rajendra Nagar Coaching Center Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी ५ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये चार इमारत मालक आणि एक थार कार मालकाचा समावेश आहे. याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी आधीच दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोषी असलेल्या ७ जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमधील राव आयएएस स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये शनिवारी रात्री पावामुळे पाणी साचले होते. या पाण्यात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कोचिंग सेंटर दुर्घटना प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचा मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात सरबजीत सिंग, तेजिंदर सिंग, हरविंदर सिंग आणि परविंदर सिंग अशा चार इमारत मालकांना अटक केली. चौघेही चुलत भाऊ आहेत. हे सर्वजण करोलबागमध्ये राहतात. त्यांनी राव आयएएस कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता यांना इमारतीचे बेसमेंट ४ लाख रुपये मासिक भाड्यावर दिले होते.
डीसीपी एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये बेसमेंटचे मालक आणि इमारतीच्या गेटचे नुकसान करून वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. डीसीपी एम हर्षवर्धन यांनी पुढे असेही सांगितले की, 'या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आम्ही या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करत आहोत आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखत आहोत.'
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये मुसळधार पावसानंतर पाणी साचले होते. यामुळे ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या ३ मृतांमध्ये दोन मुली आणि एका तरुणाचा समावेश आहे. तिघेही यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि केरळमधील हे विद्यार्थी होते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळच्या एर्नाकुलम येथील निविन डॅल्विन अशी तीन मृतांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.