पुण्यातील नाना पेठ परिसरात दिवाळीच्या फटाक्यांवरून वाद
वादाचे रूपांतर नंतर मारहाणीत
२१ वर्षीय आकांक्षा साळवे वडिलांना वाचवण्यासाठी भांडणात मध्ये पडली
धारदार शस्त्राचा वार डोक्याला लागल्याने आकांक्षा गंभीर जखमी झाली
पुण्यात दिवाळीच्या काळात फटाक्यामुळे सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या २१ वर्षीय तरुणीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात आकांक्षा नितीन साळवे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ही घटना पुण्यातील नाना पेठ परिसरात घडली. याप्रकरणी आकांक्षाचे वडील नितीन गिरधारी साळवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विनायक अतिश कांबळे (२६) आणि आर्यन विजय शिंदे (१८) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच संदेश संजय जाधव (३०) आणि त्याच्या साथीदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे रिक्षाचालक आहेत. दिवाळीनिमित्त नातेवाईकांना भेटून ते पत्नी आणि मुलीसह घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या इमारतीत राहणारे संजय जाधव आणि त्यांचे जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे रस्त्यावर फटाके फोडत होते. यावेळी उबाळे यांनी लावलेल्या फटाक्यावरून साळवे यांच्या रिक्षाचे चाक गेल्याने वाद झाला. या कारणावरून उबाळे यांनी साळवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर हा वाद मिटला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले.
मात्र, ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. नितीन साळवे हे होप हॉस्पिटलजवळ थांबले असताना संदेश जाधव आणि त्याचे मित्र तिथे आले. फटाक्यांवरून झालेल्या जुन्या वादाचा उल्लेख करत त्यांनी साळवे यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली.
वडिलांना मारहाण होत असल्याचे समजताच त्यांची पत्नी, दोन्ही मुली आणि भाचा भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विनायक कांबळे याने धारदार शस्त्राने साळवे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या आकांक्षाच्या डोक्याला शस्त्राचा वार लागला. यात तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ती बेशुद्ध पडली. आकांक्षा जखमी झाल्याचे पाहताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या आकांक्षावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून समर्थ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.