Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स

Pune Politics: पुणे महानगर पालिका निवडणूक निकालामध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपचे १२० उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे २६ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत महिला राज पाहायला मिळाले.
Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune Corporation Election Saam Tv
Published On

Summary -

  • ९ वर्षांनंतर पुणे महापालिकेचा निकाल जाहीर

  • भाजपने ११९ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम

  • १६५ पैकी ८९ महिला नगरसेविका झाल्या

  • सर्वाधिक २६,९४७ मताधिक्य राघवेंद्र मानकर यांना मिळाले

तब्बल ९ वर्षानंतर झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पुणेकरांनी त्यांचा कौल देत शहरातील ४१ प्रभागातून १६५ नगरसेवक निवडून आले. पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान पार पडलं. गुरुवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी १८ लाख ६२ हजार पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ लाख ७३ हजार ५०३ पुरुष मतदार होते तर ८ लाख ८८ हजार ८०९ महिलांनी मतदान केले. पुणे शहरातील सर्वाधिक मतदान प्रभाग ३३ शिवणे खडकवासला येथे पार पडलं. या ठिकाणी ५८ टक्के म्हणजेच शहरातील सर्वाधिक मतदान झालं तर सर्वात कमी मतदान औंध बोपोडी, प्रभाग ८ (४५ टक्के) मध्ये झालं.

शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपने पुणे महापालिकेवर झेंडा कायम ठेवत ११९ जागा निवडून आल्या. एकूण १६५ जागांपैकी भाजप आर पी आय ने ११९ जागांवर विजय मिळवत शहरातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं जाहीर केलं. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पुण्यात ठाण मांडून बसलेले उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ जागा निवडून आल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जागा निवडून आल्या. एकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्या काँग्रेसला यंदा १५ जागांवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एक जागा निवडून आली. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि राज ठाकरेंच्या मनसेला एक ही जागेवर विजय मिळवता आला नाही.

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालात कुठे पती- पत्नी, तर कुठे बंधू बंधू तर कुठे सासू सुना निवडून आल्या. इतकचं नाही तर या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने येणाऱ्या आणि काही ठिकाणी अवघ्या बोटावर मोजून येणाऱ्या मताधिक्याने काही उमेदवार निवडून आले. पाहूया पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रमुख आणि तेवढ्याच "इंटरेस्टिंग" आणि रंजक लढती...

राघवेंद्र मानकर (पुणे शहरातील सर्वाधिक २६ हजार ९४७ मताधिक्याने विजय)

पुण्यातील सर्वाधिक मतांनी मताधिक्य मिळवून निवडून येण्याचा मान भाजपच्या राघवेंद्र मानकर यांनी मिळवला आहे. भाजपकडे तरुणाईला आकर्षित करून त्यांचे संघटन मजबूत करणे तसेच पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जनसंपर्क असलेले राघवेंद्र मानकर यांच्या समोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे समीर गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र अगदी पहिल्याच फेरीपासून आघाडी घेणाऱ्या मानकर यांनी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांचे "लीड" सुरू ठेवलं. मूळ पुणेकर म्हणजेच नारायण, सदाशिव, शनिवार पेठेत असणाऱ्या प्रभाग क्रमांक २५ मधून राघवेंद्र निवडणुकीला उभे होते. मात्र त्यांना अगदी सहजपणे हा विजय मिळवता आला. त्यांच्या या विजयाचे कौतुक म्हणजे त्यांनी २६ हजार ९४७ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांचा हा विजय यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी उमेदवार म्हणून घोषित झाला आहे. मानकर यांच्या पाठोपाठ भाजपच्या रत्नमाला सातव (मताधिक्य २३,१३६), भाजपच्या स्वरदा बापट (मताधिक्य २२,६८१), भाजपचे बाळा धनकवडे (मताधिक्य २१,४१८) आणि भाजपच्या शैलजित बनसोडे (मताधिक्य २०,५४१) यांचं सुद्धा मताधिक्य २० हजारांवर राहिलं.

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

पती पत्नी, भाऊ बंधूंचे निवडणुकीत यश

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदाचे प्रमुख केंद्रस्थानी राहिलेला विषय म्हणजे राजकीय घरातील सदस्यांना मिळालेली उमेदवारी. महापालिकेच्या निकालानंतर पती-पत्नी, दोन सख्खे भाऊ, सासू-सून महापालिकेच्या सभागृहात दिसणार आहेत हे नक्की. पुणे शहरातील अनेक प्रभागात एकाच कुटुंबाची सदस्य या निवडणुकीला मैदानात उतरले. प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांचा विजय झाला तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे प्रभाग ३ मधून विजयी झाल्या. हे दोघे ही यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांचे दोन्ही मुलं विजयी झाले. राष्ट्रवादीकडून प्रभाग ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून हर्षवर्धन मानकर तर प्रभाग २५ मधून भाजपकडून राघवेंद्र मानकर या दोन्ही बंधूंनी विजयी गुलाल उधळला.

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune Results : आंदेकरांचा तुरूंगातूनही दबदबा, धंगेकरांच्या पत्नीचा दारूण पराभव, प्रभाग २३ मध्ये नेमकं काय झालं?

आंदेकर विजयी पण मारणे, नायर यांचा पराभव

अवघ्या पुण्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग २३ मधून राष्ट्रवादीच्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या सासू सुनेच्या जोडीने निवडणूक जिंकली. क्रमांक २३ रविवारपेठ, नाना पेठमधून राष्ट्रवादी चे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर तर गुंड बंडू आंदेकर यांची भावजय लक्ष्मी आंदेकर निवडून आल्या.

प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे निवडणूक लढवित होत्या मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. दुसऱ्या बाजूला, प्रभाग ३९ मध्ये राष्ट्रवादीकडून (अजित पवार) गुंड बापू नायर निवडणुकीच्या मैदानात पण त्यांचा सुद्धा पराभव झाला.

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

पुणे महापालिकेत दिसणार "महिला राज"

पुण्यातील प्रभाग ४० हा एकमेव प्रभाग होता जिथे भाजप ने सगळ्या महिला उमेदवारांना संधी दिली होती. या संधीचे सोनं करत याठिकाणी भाजप ने थेट पॅनल निवडून आणलं. अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम आणि रंजना टिळेकर अशी विजयी महिला उमेदवारांची नावं आहेत.

यंदा पुणे महापालिकेच्या सभागृहात "महिला राज" दिसणार आहे कारण पुणे महानगरपालिका निवडणुकीत 89 महिला उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला. 165 सदस्य संख्या असणाऱ्या पुणे महापालिकेत 89 महिला आता कारभारी झाल्या आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय अशा चारही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात महिलांना यंदा संधी दिली होती.

पुण्यातील राजकीय पक्षांच्या शहर अध्यक्षांचा पराभव

पुण्यात अनेक पक्षाच्या शहराध्यक्षांना पराभवाचा धक्का बसला. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 4 मुख्य पक्षाचे शहराध्यक्ष पराभूत झाले. भाजप आणि काँग्रेस वगळता इतर सर्व शहराध्यक्षांचा पराभव झाला. भाजप, काँग्रेस सह एकूण ६ पक्षाचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यापैकी 4 शहराध्यक्षांचा पराभव झाला. पुण्यात भाजप चे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेस चे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा विजय झाला तर शिवसेना उबाठा चे संजय मोरे मनसेचे साईनाथ बाबर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुभाष जगताप आणि शिवसेनेचे नाना भानगिरे यांना पराभवाला समोरं जावं लागलं.

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune Municipal Corporation Results: पुणे महापालिकेत भाजपच बनला 'बाजीराव'; वाचा विजयी उमेदवारांची यादी

काठावर पास झालेले पाच उमेदवार

पुणे महापालिकेच्या निकालात सर्वाधिक मतं ही हजारांच्या घरात असली तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत काठावर पास झालेल्या उमेदवारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. पुण्यात सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांपैकी भाजपच्या खंडू लोंढे यांनी अवघ्या 55 मतांनी विजय मिळवला तर भाजपाचे विवेक यादव यांचा 62 मतांनी विजय झाला. याच यादीत पुढे नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवी टिंगरे यांचे, त्यांचा 138 मतांनी विजय झाला तर राष्ट्रवादी चे लक्ष्मी आंदेकर 141 मतांनी आणि सूरज लोखंडे यांनी 228 मतांनी ही निवडणूक जिंकली.

सोशल मीडियावर चे "स्टार" चमकले नाहीत

९ वर्षानंतर होत असलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अनेक सोशल मिडियावरचे "स्टार" उतरले होते मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माध्यमांमध्ये चर्चेत राहिलेले तसेच सोशल मीडियावर लाखो views घेणारे अनेक राजकीय पदाधिकारी, नेते मंडळी यांना पुणेकरांनी नाकारलं. यामध्ये शिवसेना उबाठा चे वसंत मोरे, राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे, अपक्ष उमेदवार उज्वला गौड यांचा पराभव झाला तसेच माध्यमांत सातत्याने चर्चेत राहिलेले रवींद्र धंगेकर यांचे पुत्र आणि पत्नी या दोघांना पराभवाला समोरं जावं लागलं.

भाजपकडून थेट पॅनल टार्गेट, मिशन पूर्ण

भाजप ने पुणे महापालिकेत ११९ जागांवर विजय मिळवताना अनेक प्रभागात त्यांचे थेट पॅनल म्हणेजच चार पैकी चार उमेदवार निवडून आले. शिवाजीनगर, पेठांमधील भाग, कोथरूड यासारख्या भाजपच्या कोर वोट बँकेत पुणेकरांनी भरभरून मतं दिली. प्रभाग क्रमांक ३, ३२, २५, २७ यासह एकूण १८ ते १९ प्रभागात भाजप ने पॅनल निवडून आणलं.

Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स
Pune Politics: घड्याळाची 'वेळ' चुकली, पवारांची युती फसली; पुणे आणि पिंपरी हातातून गेलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com