
सागर आव्हाड, साम टीव्ही
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक बाब उघडकीस येत आहे. आता पोलिसांनी केलेल्या तपासात एक नवीन बाजू समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाणवर याआधीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीवर अमानुष छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंगचे गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहे. यासंबंधित त्याच्यावर २०१९ मध्ये वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पत्नीवर स्पाय कॅमेऱ्याने नजर
आरोपी निलेश चव्हाणचं ३ जून रोजी लग्न झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याने आपल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरातील कोपऱ्यात कॅमेरा लावले होते. निलेशने घरातील बेडरूममधील फॅन, एअर कंडिशनर यामध्ये गुप्त कॅमेरे लावले होते. जेव्हा पत्नीने निलेशचा लॅपटॉप तपासला, तेव्हा त्यात खासगी क्षणांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्यात कैद झाल्याचं आढळून आलं. याशिवाय त्यात इतर महिलांसोबतच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओही सापडले. असा आरोप निलेशच्या पत्नीनं केला.
शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप
या प्रकाराबाबत जाब विचारल्यावर निलेशने पत्नीला घरातील चाकू दाखवून धमकावले, गळा दाबला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. तिने हे सर्व निलेशच्या आई-वडिलांना सांगितले असता, उलट सासरच्या मंडळींकडूनही छळाला सुरूवात झाल्याचं तिने सांगितलं.
याच जाचाला कंटाळून तिने निलेश आणि त्याच्या नातेवाईंकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १४ जून २०२२ रोजी निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतरही पोलिसांनी अटक केली नव्हती. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
वैष्णवी प्रकरणात पुन्हा नाव समोर
आता, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातही निलेश चव्हाणचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी बाळ मागण्यासाठी वारजे पोलिस ठाण्यात धाव घेतली असता, निलेश चव्हाणने पिस्तुल दाखवून त्यांना धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करिश्मा हगवणेचा जवळचा मित्र
निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा जवळचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या वैवाहिक वादात निलेश अनेकवेळा मध्यस्थ किंवा हस्तक्षेप करणारा म्हणून सहभागी होता, असे आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी केले आहेत.
मालमत्तेची माहिती
निलेश चव्हाणचा बांधकाम आणि पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे. तसेच कर्वेनगरमधील औदुंबर पार्क सोसायटीत त्याच्या वडिलांच्या नावावर तीन फ्लॅट्स असल्याची माहितीही समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.