सचिन जाधव/सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Pune hospital timer bomb CCTV footage : हडपसर येथील 'उषाकिरण' रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश वस्तू सापडल्याच्या घटनेला आता मोठे वळण मिळाले आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित आरोपी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) गाडीवरून आल्याचे आणि त्यानेच ही वस्तू ठेवल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून तपास यंत्रणांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत.
अतिदक्षता विभागाच्या स्वच्छतागृहात सापडली वस्तू
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या (ICU) बाजूला असलेल्या पुरुष स्वच्छतागृहात ही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वच्छता कर्मचाऱ्याला जिलेटीनच्या चार कांड्या आणि त्याला डिजिटल घड्याळ (टायमर) जोडलेली ही वस्तू दिसली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. डॉ. विलास गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत ती वस्तू उचलून रुग्णालयाबाहेर आणली.
पोलिसांनी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती इलेक्ट्रिक ओला गाडीवरून रुग्णालयात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ही वस्तू ठेवताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आता त्या गाडीचा नंबर आणि आरोपीचा माग काढत आहेत. आरोपी बॉम्बसदृश वस्तू ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एटीएस आणि गुन्हे शाखेकडून संयुक्त तपास
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) ही वस्तू ताब्यात घेऊन ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेली आणि तिथे नियंत्रित स्फोट घडवून ती निकामी केली. ही स्फोटके कमी तीव्रतेची असली तरी, ती अतिदक्षता विभागाच्या बाजूला ठेवण्यामागे आरोपीचा काय कट होता, याचा तपास एटीएस करत आहे.
इतर रुग्णालयांतही कडक तपासणी
या घटनेनंतर हडपसर आणि पुण्यातील इतर महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने तपासणी मोहीम राबवली. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. आमदार चेतन तुपे पाटील, योगेश टिळेकर आणि प्रशांत तुपे यांनीही घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.