पुण्यातील खांदवेनगर येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट
स्फोटामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला
सिलिंडर बदलताना नोझलमधून गॅस गळती झाल्याने स्फोट
आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला
पुण्यामध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे. स्फोट झाला त्यावेळी मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर आई-वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गॅस सिलिंडर बदलत असताना नोझलमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला. पुण्यातील खांदवे नगरमधील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खांदवेनगर येथील इमारतीमध्ये राहणारे पांडुरंग गित्ते यांच्या घरामध्ये ही घटना घडली. गॅस सिलिंडर लावताना भयंकर स्फोट झाला. या स्फोटामध्ये पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे वडील विष्णू गित्ते आणि आई वृंदाविनी गित्ते हे गंभीर जखमी झाले होते. तर त्यांची पत्नी राजश्री गित्ते आणि मुलगी निहारिका पांडुरंग गित्ते (वय ५ वर्षे) हे किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्या आई-वडिलांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, खांदवेनगर परिसरातील फॉर्च्युन सिटीमधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघरात गॅस सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडर जोडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सिलिंडरच्या नोझलमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. घरातील देवघरात दिवा सुरू होता. गॅस घरात पसरल्याने आग लागली आणि नंतर स्फोट झाला. या स्फोटात पांडुरंग त्यांचे वडील विष्णू आणि आई वृंदाविनी गंभीर भाजल्या. तर पांडुरंग यांच्या पत्नी राजश्री या आंघोळ करीत असल्याने त्या बचावल्या. तर त्यांची ५ वर्षांची मुलगी निहारिका ही बाल्कनीमध्ये होती. नागरिकांनी तिला बाल्कनीमधून उडी मारण्यास सांगितले. तिने उडी मारल्यानंतर नागरिकांनी तिला खाली झेलले. ती किरकोळ भाजली.
या घटनेची माहिती मिळताच खराडी येरवडा येथील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पांडुरंग यांचा मृत्यू झाला. या घटनेत घरातील हॉल, किचन आणि बेडरूम मधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घरातील स्वच्छता गृहाचे दरवाजे तुटले. गित्ते कुटुंबीय मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील नंदागवळ गावचे आहेत. खराडी पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.